Wed, May 19, 2021 05:25
निर्बंधात आजपासून वाढ

Last Updated: May 05 2021 2:24AM

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन बद्दलचे नियम कडक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बुधवारपासून बाजारपेठांतील जीवनावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने 10 मेपर्यंत बंद ठेवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

राज्यातील कोरोना रुग्णांची समस्या सरकारला समजते. तसेच कोरोनाच्या रोगामुळे त्रस्त असलेल्या लोकांच्या चिंता वाढलेल्या आहे, याची सरकारने नोंद घेतली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू ठेवली असून अतिरिक्‍त निर्बंध घातले आहते. सर्वांना सामाजिक अंतर ठेऊन व्यवहार करणे सक्‍तीचे केले आहे. 2 मे पासून अमलात आणलेले हे कडक निर्बंध 10 मे पर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत लागू होणार आहेत. 

सुरूवातीला हॉटेल व रेस्टॉरेंटमध्ये पन्नास टक्के क्षमतेसह गिर्‍हाईक बसविण्यासाठी सरकारने परवानगी दिली होती. आता कोरोनाचा प्रसार वाढला जात असल्यामुळे हॉटेल व रेस्टॉरेंटवर कडक निर्बंध घातले आहेत. पुढील 10 मे पर्यंत हॉटेलात गिर्‍हाईकांना प्रवेश बंध राहणार असून पार्सेल सेवा देण्यास बंधन नाही. बाजारात फिरताना लोकांनी सामाजिक अंतर ठेऊन खरेदी करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

किराणा मालाच्या दुकानासह बँका, पेट्रोलपंप, औषधालये, रेस्टॉरंट घरपोच पार्सल ही अत्याश्यक सुरू राहणार आहे. तर कॅसिनो, बार, पब, चित्रपट गृहे, मॉल्स, ज्वेलर्स, हार्डवेअर आदी दुकाने बंद राहणार आहेत. राज्यातील काही पालिका व पंचायतींनी स्वतःहून लॉकडाऊन करून लोकांवर निर्बंध टाकण्याचे प्रयत्न केले आहेत. तरी त्या भागात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रोलपंप, औषधालये व रेस्टॉरंट सुरू ठेवावी. संपूर्ण परिसर लॉकडाऊन करण्याची गरज नाही. विनाकारण संपूर्ण लॉकडाऊन करून लोकांत भीती पसरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे. 

नोकरदारांना कामावर जाऊ द्या

लॉकडाऊनच्या भीतीमुळे सरकारी नोकर व खासगी कंपन्यांत कामाला जाणार्‍या लोकांवर विपरित परिणाम होऊ शकतो. नोकर वर्गाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आणता कामा नये, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले आहे.