Mon, Sep 21, 2020 04:55होमपेज › Goa › पर्यटनासंबंधी समस्या हाताळण्यास प्रशासन सज्ज

पर्यटनासंबंधी समस्या हाताळण्यास प्रशासन सज्ज

Published On: Aug 04 2019 1:50AM | Last Updated: Aug 04 2019 1:50AM
पणजी ः प्रतिनिधी

पर्यटन क्षेत्राशी संबंधित समस्या हाताळण्यासाठी राज्य प्रशासन सज्ज आहे. गोव्यात पर्यटकांचे स्वागत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टुरिस्ट टॅक्सी मालकांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर स्पष्ट केले आहे. दरम्यान, गोवा माईल्स अ‍ॅप विरोधात टुरिस्ट टॅक्सी चालकांनी पुकारलेला संप सलग दुसर्‍या दिवशी शनिवारी सुरूच राहिला. 

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, टुरिस्ट टॅक्सी चालकांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात येणार्‍या पर्यटकांनी गोंधळून जाऊ नये. गोव्यात येणार्‍या पर्यटकांसाठी राज्यात अंतर्गत वाहतुकीसंदर्भात आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व समस्या हाताळण्यासाठी प्रशासन सक्षम तसेच सज्ज आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

गोव्यात सुमारे 26 हजार नोंदणीकृत टुरिस्ट टॅक्सी असून यातील 8 हजार टॅक्सी या केवळ किनारी भागांमध्ये आहेत. या सर्व टॅक्सी शुक्रवारपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या आंदोलनाची पुढील कृती लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती टुरिस्ट टॅक्सी मालक संघटनेच्या सूत्रांनी दिली.

राज्यात खासगी टुरिस्ट टॅक्सी मालकांच्या संपकाळात कुठलीही अनुचित घटना घडली नसून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला नाही. मात्र, या संपामुळे दाबोळी विमानतळ तसेच रेल्वे स्थानकांवर काही प्रमाणात पर्यटकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारकडून या संपाच्या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्‍त कदंब बसेस सोडल्या जात असून गोवा माईल्स टॅक्सीदेखील सुरू आहेत. 

टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे नेते चेतन कामत म्हणाले, टुरिस्ट टॅक्सी मालकांनी गोवा माईल्स विरोधात पुकारलेला संप हा संप नसून आपल्या मागण्यांसाठी करण्यात येणारे आंदोलन आहे. गोवा माईल्स अ‍ॅप रद्द करेपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे.

टुरिस्ट टॅक्सी मालकांनी गोवा माईल्स अ‍ॅपमध्ये सहभागी व्हावे; अन्यथा अशाच प्रकारची सेवा सुरू करावी, असे आवाहन यापूर्वी सरकारकडून करण्यात आले होते. मात्र, त्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही.