Mon, Sep 21, 2020 04:51होमपेज › Goa › राज्याचा १७ हजार कोटींचा अर्थसंकल्प

राज्याचा १७ हजार कोटींचा अर्थसंकल्प

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 23 2018 1:19AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2018-19 आर्थिक वर्षासाठी 17 हजार 123 कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प गुरुवारी राज्य विधानसभेत सादर केला. त्यानंतर लगेच पुढील पाच महिन्यांसाठी 7 हजार 134 कोटी रुपयांचे लेखानुदान  मंजूर करण्यात आले. या रोजगाराभिमुख अर्थसंकल्पात  शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रावरही अधिक भर दिला गेला आहे. पूर्ण दर्जाचा अर्थसंकल्प नसल्याने नवे कोणतेही कर अथवा योजनांची घोषणा करण्यात आलेली नाही.  

अधिवेशनाच्या समारोपादिवशी गुरुवारी शेवटच्या सत्रात दुपारी 3 वाजता पर्रीकर यांनी 2018-19 सालचा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. सदर अर्थसंकल्पाला सभागृहाने एकमताने मान्यता दिली. आपल्या केवळ 5 मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणात पर्रीकर म्हणाले की, प्रकृतीच्या कारणामुळे आपण पूर्ण दर्जाचा व तपशीलवार अर्थसंकल्प मांडू शकत नाही. राज्याच्या विकासासाठी योजनांचा व अन्य करविषयक तपशील आपण पुढील अधिवेशनात सादर करणार आहोत. गोव्याच्या विकासासाठी सभागृहातील सर्व आमदारांनी आणि गोमंतकीयांनी आशीर्वाद आणि सहकार्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

वित्तमंत्री म्हणून पर्रीकर यांनी मांडलेला यंदाचा एकूण अर्थसंकल्प 17 हजार 123 कोटी 28 लाख रुपये खर्चाचा आहे. गतसालच्या 16 हजार 27 कोटी 1 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाच्या तुलेनत यंदा 6.84 टक्के वाढ दाखवण्यात आली आहे. यंदा 13 हजार 664 कोटी रुपये महसुली उत्पन्न मिळण्याची शक्यता अर्थसंकल्पात मांडण्यात आली असून 144.65 कोटींचा हा शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. सलग पाचव्यांदा  शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. एकूण 1769 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा अंदाज व्यक्त करून 310 कोटी रुपयांची रॉयल्टी खाण उद्योगातून मिळेल, अशी आशाही अर्थसंकल्पात व्यक्‍त करण्यात आली आहे.    

सभागृहाला अर्थसंकल्पातील खास तरतुदींबद्दल माहिती देताना पर्रीकर म्हणाले की, राज्य सरकारने स्थानिक युवकांना रोजगार मिळण्यावर  अर्थसंकल्पात भर दिला असून उद्योग, कामगार, रोजगार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी 548.89 कोटी रुपयांची तजवीज केली आहे. वैद्यकीय शिक्षणासह सर्व शिक्षण विभागासाठी एकूण 2445 कोटींची तरतूद केली आहे. सामाजिक आरोग्य आणि कृषी क्षेत्र आपल्या जिव्हाळ्याचे विषय  असून त्यातही भरीव तरतूद केलेली आहे.

..अन् पर्रीकरांचे डोळे पाणावले
अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे डोळे भरून आले. त्यांचा आवाज कातर होऊन ते काहीसे गहिवरले. मात्र, स्वत:ला सावरून पर्रीकर म्हणाले की, गोमंतकीय जनतेने आपल्या आजारपणाच्या काळात जे प्रेम, माया  आणि शुभेच्छा  दिल्या, त्याबद्दल  सार्‍यांचे आपण अत्यंत ऋणी आहोत. लाखो गोमंतकीय आणि विविध धार्मिक समुदायही आपल्या मागे ठाम राहिले.  सभागृहातील आमदारांनी दिलेल्या सहकार्यानेच  व जनतेच्या सदिच्छांमुळेच आपणास अर्थसंकल्प मांडण्याचे बळ मिळाले आहे.

डॉक्टरांचा सावधगिरीचा इशारा
आपली प्रकृती पूर्णत: सुधारावी यासाठी डॉक्टरांनी आपल्याला काही काळासाठी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये मिसळण्याबाबत आपल्यावर काहीअंशी बंधने आली आहेत. मात्र, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून निर्धारित कामे आपण करणार असून आपले कर्तव्य नेटकेपणाने बजावणार आहे, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.