Mon, Sep 21, 2020 05:04होमपेज › Goa › पर्रीकरांना बहुमत सिद्ध करण्यास सांगा

पर्रीकरांना बहुमत सिद्ध करण्यास सांगा

Published On: Sep 19 2018 7:59AM | Last Updated: Sep 19 2018 7:59AMपणजी : प्रतिनिधी

भाजप आघाडी सरकार अल्पमतात आले असून राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी एकदिवशीय विशेष अधिवेशन बोलावून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना बहुमत  सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने मंगळवारी राज्यपालांकडे केली. या मागणीवर संविधानातील तरतुदींचा अभ्यास करून येत्या चार दिवसांत निर्णय देणार असल्याचे आश्‍वासन राज्यपाल सिन्हा यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.     

राज्यपाल सिन्हा यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता भेटीची वेळ दिली. त्यावेळी काँग्रेसचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स वगळता अन्य सर्व आमदार तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने राज्यपाल सिन्हा यांच्याशी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करून निवेदन सादर केले. 

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कवळेकर म्हणाले की, भाजप आघाडी सरकारचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून त्यांनी आपले बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली आहे. भाजप आघाडी सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करणे जमत नसेल, तर  काँग्रेसकडे बहुमत असल्याचे आम्ही दाखवून देऊ. काँग्रेसला अन्य पक्षातील तसेच अपक्ष आमदारांचा पाठिंबा असून विशेष अधिवेशनात  बहुमत सिद्ध करून दाखवण्याची आमची तयारी आहे.  यासाठी एकदिवशीय अधिवेशन राज्यपालांनी बोलवावे, अशी मागणी काँग्रेसने लेखी निवेदनातून केली आहे. 

राज्यपालांना दिलेल्या निवेदनात काँग्रेसने नमूद केले आहे की, राज्यपालांनी भाजप आघाडी सरकारला विधानसभा बरखास्त करण्याची संधी देऊ नये. सदर सरकार स्थापन होऊन फक्‍त 18 महिने झाले असताना पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज नाही. जर भाजप व अन्य आघाडी पक्षातील नेत्यांना सरकार चालवणे जमत नसेल तर काँग्रेसची सत्ता स्थापण्याची तयारी आहे. काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असून काँग्रेसला सरकार स्थापनेेची संधी राज्यपालांनी द्यावी. 

शक्‍तिपरीक्षणावेळी काँग्रेसचा नेता दाखवू : कवळेकर
विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर म्हणाले की, काँग्रेस पक्षात  नेतृत्वाबाबत वाद असल्याचे चित्र विरोधकांकडून रंगविले जात आहे. मात्र त्यात तथ्य नाही. जर आम्हाला बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळाली तर आमचा नेता शक्‍तिपरीक्षणावेळी दाखवू. विद्यमान भाजप आघाडी सरकार अस्थिर असून  सरकार बरखास्त करण्याचा अथवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा पर्याय राज्यपालांनी स्वीकारू नये, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे.