Mon, Sep 21, 2020 04:34होमपेज › Goa › ‘इएसआय, अबकारी’अधिकार्‍यांची अमेरिकावारी  

‘इएसआय, अबकारी’अधिकार्‍यांची अमेरिकावारी  

Published On: May 21 2018 1:17AM | Last Updated: May 21 2018 1:17AMपणजी : प्रतिनिधी

गोवा पर्यटन व्यवसायवृद्धीकरिता  प्रोमोशनसाठी अमेरिका दौर्‍यावर गेेलेल्या  शिष्टमंडळात पर्यटन खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांऐवजी  इएसआय तसेच  अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.  सदर अमेरिका दौरा म्हणजे ‘टुरिझम प्रोमोशन’च्या नावावर लाखो रुपयांचा चुराडा असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी   येथे रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

या अमेरिका दौर्‍याचा गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला किती लाभ होणार याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. त्याचबरोबर या दौर्‍यावर खर्चण्यात येणारा पैसा पुन्हा सरकारी तिजोरीत जमा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

पणजीकर म्हणाले,  गोवा पर्यटन खात्याचे काम हे पर्यटनवृध्दीचे आहे. मात्र या खात्याला त्यात अपयश येत  असून पर्यटन विकासाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी केली जात आहे.  पर्यटन मंत्र्यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ अमेरीका दौर्‍यावर गेले आहे. या दौर्‍यावेळी  गोवा पर्यटन तेथे प्रोमोट केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गोव्यात येणार्‍या  अमेरीकन पर्यटकांची संख्या  कमी असल्याने   जास्तीच जास्त पर्यटक गोव्याकडे वळावे, हा या दौर्‍याचा हेतू असल्याचे म्हटले जात आहे. मात्र   जे शिष्टमंडळ गेले आहे  त्याचा निकष कुठल्या आधारे ठरवण्यात आला आहे, हे सरकारे सांगावे  अशी मागणी त्यांनी केली.

या शिष्टमंडळात पर्यटन खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना  डावलून   कनिष्ठ  अधिकार्‍यांना नेण्यात आले आहे. त्याचबरोबर  पर्यटन खात्याऐवजी  अन्य सरकारी खात्याचे अधिकारी जसे इएसआय व   अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांचाही समावेश करण्यात आला आहे.  याशिवाय   शिष्टमंडळातील अधिकार्‍यांनी  आपल्या   कुटुंबीयांना देखील आपल्या  सोबत नेले आहे.  सदर दौरा म्हणजे पैशाची उधळपट्टी आहे. सरकारने  या दौर्‍याचा हिशेब देणे आवश्यक असल्याचे पणजीकर  म्हणाले. 

 पर्यटन वृध्दीच्या नावाखाली हे शिष्टमंडळ ‘जीवाची अमेरीका’ करण्यासाठी गेले आहे राज्यात मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याने    कुणाचेच कुणावर नियंत्रण नाही. प्रत्येकजण आपल्याला हवे तसे करीत आहेत.   मुख्यमंत्री नसल्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचीही टीका  पणजीकर यांनी केली.

 यावेळी प्रदेश काँग्रेस प्रवक्ते  सिध्दनाथ बुयांव,  तुलिओ डिसोझा व  क्रिस्पिनो  लोबो उपस्थित होते.

काँग्रेसचे उद्यापासून ‘नमन तुका गोंयकारा’

प्रदेश काँग्रेसकडून 22 मे पासून  राज्यभरात  ‘नमन तुका गोंयकारा’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे,असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सिध्दनाथ बुयांव यांनी सांगितले. ते म्हणाले,या उपक्रमांतर्गत   सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते  बस, रिक्शाव्दारे प्रवास करणार आहेत.  22 मे रोजी पणजी, म्हापसा, हळदोणे, मये व डिचोली तर  23 मे रोजी मडगाव, कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को व मुरगाव या मतदारसंघांमध्ये  जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्‍न जाणून घेतले जातील. सदर संकल्पना सर्व 40 ही मतदारसंघांमध्ये राबवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.