Sun, Sep 20, 2020 09:51होमपेज › Goa › गोव्यात मुख्यमंत्री सावंत यांच्या सरकारने जिंकला विश्वास; विधानसभेत बहुमत सिद्ध

गोव्यात मुख्यमंत्री सावंत यांच्या सरकारने जिंकला विश्वास; विधानसभेत बहुमत सिद्ध

Published On: Mar 20 2019 1:02PM | Last Updated: Mar 20 2019 1:17PM
पणजी : प्रतिनिधी

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारची विधानसभेत सत्वपरीक्षा झाली. आज विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने जिंकला आहे. 

विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने २० आमदारांनी मतदान केले. यात भाजपचे ११, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ३, गोवा फॉरवर्ड पक्षाचे ३ आणि अपक्ष ३ आमदारांचा समावेश आहे. तर विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात १५ आमदारांनी मतदान केले. यात काँग्रेस १४ आणि राष्ट्रवादीच्या एका आमदारांचा समावेश आहे.   

राज्य विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन आज, बुधवारी (दि.२०) बोलवण्यात आले. सकाळी ११.३० वाजता अधिवेशनाला प्रारंभ झाला. आघाडी सरकारचे नवे मुख्यमंत्री सावंत यांना मुख्यमंत्रिपदाचा ताबा स्वीकारण्याच्या दुसर्‍याच दिवशी अग्‍निपरीक्षेला तोंड द्यावे लागले.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी डॉ. प्रमोद सावंत यांनी सभापतिपदाचा राजीनामा उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे सादर केला. हा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. आज झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात उपसभापती मायकल लोबो यांनी सभापती म्हणून कामकाज पाहिले.

४० सदस्यांच्या विधानसभेत सध्या आमदारांची संख्या ३६ आहे. भाजपच्या नेतृत्त्वाखालील आघाडीमध्ये २१ आमदार आहेत. भाजप आघाडीचे विधानसभेत पूर्ण बहुमत असल्याने विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज, विश्वासदर्शक ठराव जिंकला.

मनोहर पर्रीकर, फ्रान्सिस डिसोझा, विष्णू वाघ यांना आदरांजली

दरम्यान, गोवा विधानसभेत शोक प्रस्तावाद्वारे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि माजी उपसभापती विष्णू वाघ यांना आदरांजली वाहण्यात आली. भाजपचे आमदार राजेश पाटणेकर यांनी  शोक प्रस्ताव मांडला. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांच्यासह माविन गुद्निन्हो, गोविंद गावडे, विजय सरदेसाई, मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, चंद्रकांत कवळेकर, सुदीन ढवळीकर यांनी भाषणे केली.