Mon, Nov 30, 2020 13:56होमपेज › Goa › गोवा फॉरवर्डने तळ्यात मळ्यात करू नये : युवा काँग्रेस

गोवा फॉरवर्डने तळ्यात मळ्यात करू नये : युवा काँग्रेस

Published On: May 15 2019 6:59PM | Last Updated: May 15 2019 6:53PM
पणजी : प्रतिनिधी

गोवा फॉरवर्ड पक्षाने मंगळवारी पत्रकार परिषद घेवून गोवा विद्यापीठ रहिवाशी दाखला लागू करण्यासंदर्भातील विषयावर युवा कॉग्रेसकडून पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली होती. गोवा फॉरवर्ड पक्ष सरकारसोबत राहुन निदर्शने करीत आहे. त्यामुळे  सरकारही त्यांचेच व निदर्शने व आंदोलनेही त्यांचीच असा प्रकार सुरू आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने सरकारला दिलेले समर्थन मागे घेवून गोमंतकीयांसाठी लढा दिला तर कॉग्रेस पक्ष त्यांच्यासोबत असेल. गोवा फॉरवर्डने तळ्यात मळ्यात करू नये, असे  प्रदेश युवा कॉग्रेसचे सांगे प्रभाग अध्यक्ष मॅशू डिकॉस्टा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

डिकॉस्टा यांनी म्हटले की, गोवा फॉरवर्डने केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी सरकारच्या काही गोष्टींना विरोध करू नये. सरकारसोबत राहून लोकांच्या  समस्या सोडविण्यासाठी गोवा फॉरवर्डला सत्ता मिळाली आहे. त्यामुळे सरकारचा एक भाग असताना त्यांच्या विरोधात बोलणे हे चुकीचे आहे. निदर्शने, आंदोलन करणे, रस्त्यावर येणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. गोवा फॉरवर्ड सरकारच्या निर्णयांशी सहमत नसल्यास त्यांनी सरकारामधून बाहेर पडावे. त्यांनी असे केल्यास आमचा त्यांना पाठिंबा असेल. 

कॉग्रेसचे पक्षश्रेष्ठीं आणि प्रदेश कॉग्रेसचा राजद्रोह कायद्याप्रती असलेल्या वेगवेगळ्या दृष्टीकोणाबद्दलही गोवा फॉरवर्डने कॉग्रेसवर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना युवा कॉग्रेसचे सरचिटणीस अरचित नाईक हे  म्हणाले, प्रदेश कॉग्रेस, कॉग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींसोबतच असून राजद्रोह कायदा रद्द करणे हेच आमचे मत आहे. परंतु, सरदेसाई यांनी खुलेआम युवांच्या हाती शस्त्र देण्याच्या आशयाचे विधान केले आहे. युवांच्या हाती नोकरसंधी द्यायचे सोडुन शस्त्र देण्याचे सरदेसाई म्हणाले. त्यामुळे  सरदेसाई यांच्या विरोधात दाखल केलेला कायदा व तक्रार ही परिस्थितीला लागू होते, असेही त्यांनी सांगितले.

तसेच पत्रकार परिषदेत कुंभारजुवा प्रभाग अध्यक्ष ग्लेन काब्राल व जिल्हा सचीव मुईन मालवानी उपस्थित होते.