Thu, Oct 01, 2020 02:32होमपेज › Goa › मडगाव : बेडकांच्या शिकाऱ्यास अटक

मडगाव : बेडकांच्या शिकाऱ्यास अटक

Published On: Jun 15 2019 7:08PM | Last Updated: Jun 16 2019 1:44AM
मडगाव  : प्रतिनिधी

मान्सूनचे आगमन होताच सासष्टीमधील जंपिंग चिकन खवय्यांना बेडकांच्या शिकारीचे वेध लागले आहेत. राज्यात अजून मान्सून सक्रिय झालेला नाही, पण बेडकांच्या शिकारीला मात्र सुरुवात झाली आहे. फातोर्डातील चंद्रावडो येथे बेडकांची शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नावेदाद सोराईस याला वनखात्याने अटक केली असून त्याने पकडलेल्या तीन मोठया प्रजातीच्या बेडकांना जीवनदान देण्यात आले आहे.

शुक्रवारी मध्यरात्री दिडच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. मूळ चंद्रावाडो येथील नावेदाद जॉकीम सोराईस हा शुक्रवारी रात्री चंद्रावाडो येथील शेतात बेडके पकडण्याचे काम करत होता. या वेळी गस्तीवर असलेल्या वन कर्मचार्‍यांना सोराईस यांच्यावर संशय आल्याने त्यांनी त्वरित शेतात उतरून त्याला ताब्यात घेतले. मडगाव वन कार्यालयाचे आर. एफ. ओ. सिद्धेश गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरवातीला सोराईस याने आपण मासळी आणि खेकडे पकडण्यासाठी शेतात उतरल्याचे वन कर्मचार्‍यांना सांगितले होते. पण त्याच्या जवळील पिशवीची झडती घेतली असता खेकडयांबरोबर पिशवीत मोठया आकाराचे तीन बेडूक आढळून आले. 

त्यानंतर सोराईस याला लगेच ताब्यात घेवून त्याच्या विरोधात वाईल्‍ड लाईफ प्रोटेक्शन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यासंदर्भातील माहिती सिद्धेश गावडे यांनी दिली आहे. तर त्या तीन बेडकांना पुन्हा शेतात सोडण्यात आल्याची माहिती ही गावडे यांनी दिली आहे.