Thu, Oct 01, 2020 17:05होमपेज › Goa › पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द 

पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द 

Last Updated: Mar 19 2020 12:59AM
पणजी:पुढारी वृत्तसेवा

‘कोरोनाव्हायरस’च्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील शाळांतील पहिली ते 8 वीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट उत्तीर्ण करण्याच्या आदेश शिक्षण खात्याने काढला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे ‘कोरोनाव्हायरस’चा प्रसार रोखण्यासाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे शिक्षण खात्याने पालन केले आहे. मात्र, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असून परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवण्याच्या सक्तीचे पालन केले जाईल, या आदेशात नमूद करण्यात आले असल्याचे शिक्षण उपसंचालक नागराज होन्नेकरी यांनी सांगितले. 

राज्य सरकारने  राज्यातील सर्व शाळा 16 मार्चपासून  31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या काढलेल्या आदेशाबाबत अनेक शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून म्हापसा येथील सारस्वत विद्यालयाने आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याविषयी काढलेल्या नोटिशीमुळे या गोंधळात भर पडली होती. राज्यातील इतर शाळांनीही तशीच व्यवस्था राबविण्यासाठी शिक्षण संचालनालयाकडे परवानगी मागितली होती. याविषयी शिक्षण संचालक वंदना राव यांनी मंगळवारी खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन चर्चा केली.

या बैठकीनंतर होन्नेकरी यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले, की राज्य शिक्षण खात्याच्या संचालक वंदना राव यांनी मंगळवारी संध्याकाळी राज्यातील सर्व शाळांना परिपत्रक पाठवले आहे. या पत्रकानुसार  1ली ते 8 वीपर्यंतच्या सर्व वर्गांना सुट्टी देण्यात आली असून  या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अंतिम परीक्षा घेतली जाणार नाही.  ‘शिक्षण हक्क कायद्या’तील तरतुदीनुसार  1ली ते 8 वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्षातील एकूण कामगिरीच्या आधारे गुण देऊन पुढील वर्गात बढती देण्यात येणार आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. 

होन्नेकरी म्हणाले, की म्हापसा येथील सारस्वत विद्यालयाने पालकांना पाठवलेल्या नोटिशीत पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्याने राज्यातील अनेक शाळांच्या कार्यालयातून खात्याला विचारणा करण्यात आली. याविषयी खात्याच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी चर्चा करून त्यावर अंतिम निर्णय घेताना राज्यातील शाळांना सदर निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. सध्या नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुरू असून त्या या आठवड्यात संपणार आहेत. 

एका बाकड्याचे अंतर

राज्यातील शाळांतील परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये किमान एक मीटर अंतर ठेवण्यास सांगण्यात आले असून याआधी एका बाकड्यावर दोघां विद्यार्थ्यांना बसण्यास दिली जाणारी परवानगी यापुढे दिली जाणार नाही. यामुळे, परीक्षा देणार्‍या दोन विद्यार्थ्यांमध्ये एक रिकामी बाकडा ठेवण्यात येणार आहे. सध्या शाळेतील वर्ग बंद असल्याने अनेक वर्ग रिकामे असून परीक्षेची व्यवस्था करण्यात काही अडचण येणार नाही, असे सांगण्यात आले. 
 

 "