Mon, Sep 21, 2020 04:25होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांच्या मुंडकार नोंदणी अर्जासंदर्भात अहवाल देण्याचे निर्देश

मुख्यमंत्र्यांच्या मुंडकार नोंदणी अर्जासंदर्भात अहवाल देण्याचे निर्देश

Last Updated: Dec 24 2019 1:53AM
पणजी ः प्रतिनिधी 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोठंबी डिचोली येथील जागेबाबत मुंडकार म्हणून नोंदणी केल्याच्या अर्जा संदर्भात उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी डिचोली मामलेदारांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोठंबी डिचोली येथील सर्व्हे क्रमांक 60/8 ही जागा मुख्यमंत्री डॉ. सावंत गिळंकृत करू पाहत असून यासाठी ते स्वतःला मुंडकार म्हणून दाखवत असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अ‍ॅड. आयरीश रॉड्रिग्स यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी हा अहवाल मागितला आहे.

अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी तक्रारीत आरटीआयअंतर्गत प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी 26 सप्टेंबर रोजी डिचोली मामलेदार कार्यालयाकडे अर्ज दाखल केला असून या अर्जात स्वतःला गोवा मुंडकार कायदा 1975 च्या कलम 8-अ अंतर्गत मुंडकार म्हणून जाहीर करावे, 

अशी मागणी केली आहे. सदर अर्ज हा केवळ तेथील जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न आहे. महत्वाचे म्हणजे या अर्जावर आतापर्यंत मागील तीन महिन्यांत तीन सुनावण्या घेण्यात आल्या असल्याचे रॉड्रीग्स यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

डॉ. सावंत यांनी या अर्जात मूळ भाटकाराच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्याचबरोबर ते तसेच त्यांचे पालक या जमिनीत कधीपासून मुंडकार म्हणून रहात आहेत, याचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, असे असूनही त्यांनी स्वतःला मुंडकार म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात डिचोली मामलेदारांनी हा अर्ज फेटाळणे गरजेचे होते. परंतु तसे काहीच करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी एका ठिकाणी बंगला बांधला असताना आता दुसर्‍याच जमिनीचा मुंडकार म्हणून जाहीर करण्याची मागणी या अर्जात केल्याचा आरोप अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी तक्रारीत केला आहे.

 "