Mon, Nov 30, 2020 14:18होमपेज › Goa › लोकसभेसाठी श्रीपाद नाईक, सावईकर

लोकसभेसाठी श्रीपाद नाईक, सावईकर

Published On: Mar 24 2019 1:17AM | Last Updated: Mar 24 2019 1:17AM
पणजी : प्रतिनिधी

भाजपने लोकसभेच्या गोव्यातील दोन जागांसाठी तसेच विधानसभेच्या म्हापसा, मांद्रे व  शिरोडा मतदारसंघात होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अपेक्षेनुसार  लोकसभेच्या  उत्तर गोवा मतदारसंघातून खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक तर  दक्षिण गोवा मतदारसंघातून खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

म्हापसा पोटनिवडणुकीसाठी माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र जोशुआ डिसोझा यांना  उमेदवारी देण्यात आली आहे. मांद्रेतून दयानंद सोपटे व शिरोडा येथून सुभाष शिरोडकर यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. 

भाजपकडून  उत्तर व दक्षिण गोव्यात विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर गोव्यात मंंत्री नाईक तर दक्षिण गोव्यात अ‍ॅड. सावईकर यांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. 
पणजी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली  नसल्याने पणजीच्या उमेदवारीवर निर्णय झाला नसल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले. पणजीचे आमदार तथा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्याने पणजीची जागा  रिक्‍त झाली आहे. 

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे व शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांचीही या दोन्ही मतदारसंघांसाठी नावे जवळपास निश्‍चित करण्यात आली  होती. मात्र,  मांद्रेतून  सोपटे यांना उमेदवारी देण्यास माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मध्यंतरी तीव्र विरोध दर्शवून बंडखोरीची भाषा केली होती. त्यामुळे मांद्रेतील उमेदवारीसंबंधी निर्णय लांबला होता. आता पार्सेकर यांची समजूत काढण्यात भाजपला यश आले असून सोपटे  यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

म्हापसाचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे तेथे होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल याची उत्सुकता कायम होती. म्हापसा पोटनिवडणुकीसाठी डिसोझा यांचे पुत्र जोशुआ डिसोझा तसेच म्हापसाचे नगरसेवक सुधीर कांदोळकर यांची नावे चर्चेत होती. कांदोळकर यांनी प्रचारालादेखील सुरुवात केली होती. मात्र, भाजपकडून जोशुआ डिसोझा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कांदोळकर यांना उमेदवारी नाकारल्याने सध्या ते बंडखोरीच्या तयारीत आहेत. कांदोळकर यांनी आपल्या समर्थकांची रविवार दि.24 रोजी सकाळी 11 वाजता बैठक बोलावली असून ते पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

योग्य निवड : सरदेसाई

जोशुआ डिसोझा हे वडील फ्रान्सिस डिसोझा यांचा वारसा पुढे नेण्यासाठी  योग्य व्यक्‍ती असल्याचे मत उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्‍त केले आहे. भाजपकडून म्हापसा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आल्याने जोशुआ यांचे त्यांनी अभिनंदन केले.