Mon, Nov 30, 2020 12:59होमपेज › Goa › भाजप केवळ आमदार खरेदी करतेय

भाजप केवळ आमदार खरेदी करतेय

Published On: May 15 2019 1:51AM | Last Updated: May 14 2019 11:14PM
पणजी : प्रतिनिधी

भाजपमधील बहुतेक आमदार हे काँग्रेसचेच  आहेत. भाजप केवळ आमदार खरेदी करत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपने जनमत नसताना  राज्यात   सरकार स्थापन करून  ते जनतेवर लादले असल्याची टीकाही त्यांनी  केली.

चोडणकर म्हणाले, राज्यात राजकारणाची पातळी व दर्जा घसरत आहे.  भाजपने काँग्रेसचे तीन आमदार फोडून आपल्याकडे नेले. यावरून ते  सत्ता व पैशांचा गैरवापर करीत असल्याचे सिध्द होते. या तीन आमदारां नंतर त्यांनी  पुन्हा   काँग्रेस आमदार फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश न आल्याने त्यांनी मगो चे दोन आमदार फोडले  असा आरोप त्यांनी केला.

भाजप प्रदेशाध्यक्षांनी नुकतेच   विरोधी पक्षाचे दोन आमदार  सरकारला पाठींबा देणार असल्याचे विधान  केले.  या विधानाचे पक्ष खंडन करून आमचे सर्व आमदार एकसंध असल्याचे चोडणकर म्हणाले.  भाजप केवळ आमदार विकत घेणारा पक्ष असून त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी करू नयेत. भाजपमधील बहुतेक आमदार हे काँग्रेसचेच असल्याची टीका त्यांनी  केली.

 पोटनिवडणूकांमध्ये जर भाजपचेच आमदार निवडून येणार आहेत तर मग अन्य पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा घेण्याची गरज काय. यावरून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचे स्पष्ट होत आहे,असे चोडणकर म्हणाले. 23 मे रोजी निवडणूकीच्या निकालाव्दारे ते भाजपला धडा शिकवणार असल्याचे चोडणकर यांनी  सांगितले.

 विरोधी पक्षनेते  बाबू कवळेकर म्हणाले, काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध आहेत.  ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत.   ज्या आमदारांना जायचे होते ते गेले.  काँग्रेसचे आळखीन  आमदार कुठेही जाणार नाहीत.   काँग्रेसचे आणखी आमदार फोडण्यात अपयश आल्यानेच त्यांनी   मगोचे आमदार फोडले.  विरोधी पक्षाचे दोन आमदार सरकारला पाठींबा देणार असे विधान करुन भाजप जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.यावेळी  आमदार  टोनी फर्नांडिस, अ‍ॅड. यतिनश नाईक व अन्य उपस्थित होते.  

‘कॅसिनोंना भाजपकडून खतपाणी’

 भाजपने  कॅसिनोंना खतपाणीच घातले, असा आरोप  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी  केला. कॅसिनो काँग्रेसने आणले ,असा आरोप भाजप करीत आहे. मात्र हेच कॅसिनो हटवण्याचे आश्‍वासन वेळावेळी भाजपने दिले. मात्र त्यातून पैसा मिळत असल्यानेच भाजपने या कॅसिनोंना खतपाणी घातले. कॅसिनोंच्या नावे ते सर्वांना लुटून जनतेला मुर्ख बनवत असल्याचा आरोप त्यांनी केला.