Mon, Sep 21, 2020 05:39होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांशी वन-टू-वन चर्चा

मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांशी वन-टू-वन चर्चा

Published On: Oct 12 2018 1:04AM | Last Updated: Oct 12 2018 1:04AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यातील राजकीय वादळ शमविण्यासाठी दिल्लीतील ‘एम्स’ इस्पितळात शुक्रवारी (दि.12) बोलविलेेल्या बैठकीत सहा मंत्री व भाजपचे तिन्ही खासदार सहभागी होणार असले तरी प्रत्येकाशी वैयक्‍तिक चर्चा करूनच मुख्यमंत्र्यांकडील काही खात्यांचे वाटप केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बैठकीसाठी बहुतेक मंत्री गुरुवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. उर्वरित मंत्री  शुक्रवारी (दि.12) पोचणार आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई आणि केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे गुरूवारी एकत्रच एकाच विमानाने दिल्लीला दाखल झाले आहेत. महसूल मंत्री रोहन खंवटे हे बुधवारी दिल्लीला पोचले होते.   

भाजपचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, वीज मंत्री नीलेश काब्राल आणि नगरविकास मंत्री मिलींद नाईक  आदी चार मंत्री दिल्लीला पोचले असून मंत्री नसलेले एकमेव असे उपसभापती लोबो, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे शुक्रवारी दिल्लीला पोचणार आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर तसेच खजिनदार संजीव देसाई हेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

याआधी  सर्व मंत्र्यांसोबत एकत्र बैठक घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी पर्रीकर आता प्रत्येक मंत्र्याशी ‘वन टू वन’ बैठक घेऊन त्यांचे मत जाणून घेणार आहेत. त्यानंतर गरज पडल्यास सर्वांची एकत्र बैठक घेतली जाणार  आहे. खाते  वाटपावर वाद झाला नाही तर शुक्रवारी संध्याकाळपर्यंतच हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. अन्यथा येत्या दोन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब केले  जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडील खात्यांवर भाजपचा दावा

मुख्यमंत्र्यांकडील सुमारे 30 खात्यांवर भाजपचा हक्‍क असल्याचा नवा दावा आता बैठकीत पेश केला जाणार आहे. या दाव्यामुळे भाजप मंत्र्यांनाच मुख्य ती सर्व खाती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, घटक पक्षातील नेत्यांचा या नव्या प्रस्तावाला विरोध असून मुख्यमंत्र्यांकडील खाती ही सर्व घटक पक्षांचीही असल्याचा संदेश पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.