Mon, Nov 30, 2020 13:48होमपेज › Goa › मंत्री लोबोंनी कॅसिनो नेरूलात आणूनच दाखवावेत !

मंत्री लोबोंनी कॅसिनो नेरूलात आणूनच दाखवावेत !

Last Updated: Oct 14 2019 12:49AM
बार्देश ः प्रतिनिधी 

कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो मांडवी नदीतील  कॅसिनो नेरुलमध्ये आणण्याची भाषा करत आहेत, त्यांनी हिंंमत असल्यास तसा प्रयत्नच करून दाखवावा,आपण साळगाव  मतदारसंघातील तमाम लोकांना घेऊन मांडवीच्या पाण्यात आंदोलन छेडू,असा आव्हानवजा इशारा साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी शनिवारी साळगावात आयोजित सभेत दिला.

मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंच्या स्थलांतराला आपण मंंत्रिपदी असताना विरोध केला होता. त्यावेळी आपण तशी परवानगी दिली असती तर आज गोव्यातील गर्भश्रीमंतापैकी  एक होऊन बसलो असतो,असेही ते म्हणाले.

साळगांव पठारावरील बहुचर्चित कचरा प्रकल्पाच्या विस्तारीकरणास प्रखर विरोध करीत  पंचायत इमारतीच्या आवारात, साळगाव वाचवा, या आभियानांतर्गत आयोजित जाहीर सभेत जयेश सांळगावकर बोलत होते. 

व्यासपीठावर साळगावच्या सरपंच श्रद्धा बोरकर, नेरूलच्या सरपंच पियेदाद आल्मेदा, कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर, माजी सरपंच भोलानाथ घाडी, लाफिरा गोम्स, एकनाथ तोरस्कर, जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली सातार्डेकर,  अभियंते डीन डिक्रुज, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाडगांवकर, जॅक कुयेलो तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.  

साळगाववासीयांच्या भावनांची कदर न करता तसेच बहुचर्चित कचरा प्रकल्पामुळे झालेल्या दयनीय स्थितीची पर्वा न करता मंत्री मायकल लोबो यांनी सदर प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे प्रयत्न चालविले आहेत. साळगावची जनता त्या विस्तारीकरणाचा विरोध करीत असून तसा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडण्यासाठी  रस्त्यावर उतरण्यासही मागेपुढे पाहणार नाही. राजकारणात आपण असू अथवा नसू साळगाव ग्रामस्थांबरोबर नेहमीच राहणार असल्याचे आश्वासन आमदार जयेश साळगावकर यांनी यावेळी दिले.

आपले कुटुंब नदीकिनारी वास्तव्य करणारे आहे त्यामुळे नदीचा पैलतीर आपण सहज पार करीन, तेव्हा आपल्याला पाण्यात सोडण्याची भाषा करणार्‍या मंत्री लोबो यांनी यापुढे विचारपूर्वक विधाने करण्याचा सल्ला साळगावकर यांनी त्यांना दिला.  यावेळी व्यासपीठावरील सर्वच्या सर्वच वक्त्यांनी साळगांव कचरा प्रकल्पामुळे गांवकर्‍यावर उद्भवलेल्या संकटाची माहिती कथन केली. 

सदर प्रकल्पामुळे साळगावातील नदी नाले तसेच विहिरी प्रदूषित झालेल्या आहेत अशा अवस्थेत येथील प्रकल्पाचे विस्तारीकरण झाल्यास गांवकर्यावर गांव सोडून जाण्याची वेळ येणार असल्याची भिती यावेळी बहुतेक वक्त्यांनी व्यक्त केली.  यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची कचरा प्रकल्प उभारणी दरम्यान केलेल्या वक्त्याची चित्रफीत दाखविण्याचा आयोजकांनी प्रयत्न केला असता उपस्थितांनी त्यास आक्षेप घेतल्याने ती चित्रफीत आयोजकांना मागे घ्यावी लागली. प्रेमानंद दिवकर, डीन डिक्रूज, रमेश घाडी, सुवर्ण सिंंग राणे, एकनाथ तोरस्कर, जेक कुयेलो, लाफिरा गोम्स, भोलानाथ घाडी, ऑस्टीन गामा आदींची सदर प्रकल्पाच्या विस्तारीकरणास प्रखर विरोध करणारी भाषणे झाली. सभेला मोठ्या प्रमाणात स्थानिक तसेच शेजारच्या गावांतील ग्रामस्थांची उपस्थिती होती.