Mon, Sep 21, 2020 05:37होमपेज › Goa › गोव्यात येणार भाजपचे दिग्‍गज स्टार प्रचारक

गोव्यात येणार भाजपचे दिग्‍गज स्टार प्रचारक

Published On: Apr 02 2019 1:55PM | Last Updated: Apr 02 2019 1:55PM
पणजी : प्रतिनिधी

लोकसभा तसेच तीन पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी गोव्यात भाजपचे स्टार प्रचारक येणार आहेत. यामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा  यांच्यासह  केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

केंद्रीय मंत्र्यांमध्ये  गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व  केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांचा समावेश असून या सर्वांच्या गोव्यात जाहीरसभा तसेच रॅली होणार आहेत.

गोव्यात लोकसभा तसेच मांद्रे, शिरोडा व म्हापसा पोटनिवडणुकीसाठी  २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहेत. गोव्यात लोकसभेच्या उत्तर व दक्षिण गोवा अशा दोन जागा असून सध्या या दोन्ही जागांवर भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे या दोन्ही जागा काबीज करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहेत.  

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या प्रचार मोहिमांना पुढील आठवड्‍यांपासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवार, १२ एप्रिल रोजी  प्रचार सभा होईल. मात्र, त्यासाठीची जागा अजूनही निश्‍चित करण्यात आलेली नाही.याशिवाय राजनाथ सिंग यांची शिरोडा व म्हापसा येथे रॅली होणार आहेत. त्‍याचबरोबर, नितीन गडकरी आणि स्मृती ईराणी यांच्याही प्रत्येकी दोन जाहीर सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.