Wed, May 19, 2021 05:12
विश्‍वजितने अपयशाची नैतिक जबाबदारी घ्यावी

Last Updated: May 05 2021 2:24AM

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सत्तारूढ भाजपचे राजधानीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांना मंगळवारी घरचा आहेर दिला. ध्वनिचलचित्रफितीमध्ये त्यांनी आरोग्यमंत्र्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. आरोग्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन अपयश आल्याची कबुली दिली पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.

दोन दिवसांपूर्वीच बाबूश आणि आमदार टोनी फर्नांडिस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटले होते. भेटीत अकार्यक्षम मंत्र्यांना बदलण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी आरोग्यमंत्र्यांवरच थेट गंभीर आरोप केले. ते खूप संतापून बोललेले आहेत.

लोक मरताहेत आणि आरोग्यव्यवस्थेचे नेतृत्व कोण करते, अशी विचारणा त्यांनी केली. आरोग्यमंत्र्यांनी गोमंतकीयांची माफी मागायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. येणार्‍या काळात दररोज 200 ते 300 लोक मरतील, अशा प्रकारची विधाने करून आरोग्यमंत्र्यांनी काय साधले? असे विधान करून समाजाला वेदना का दिल्या? लोक मरणार नाहीत, यासाठी तुम्ही काय तयारी केली? ते सांगा, असे त्यांनी विचारले. नीला मोहनन आणि मेनका या माजी प्रशासकीय अधिकार्‍यांचे 

बाबूश यांनी कौतुक केले. व्यावसायिक पद्धतीने त्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेला काम केल्याचा उल्लेख त्यांनी केला. या दोन्ही अधिकार्‍यांच्या कामकाजात मुख्यमंत्र्यांसह कोणाचाही हस्तक्षेप नव्हता, याची त्यांनी आठवण करून दिली. जीव वाचवल्याबद्दल गोमंतकीयांनी त्यांचे आभारी राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आता जे लोक कोरोनामुक्‍त होताहेत, ते केवळ डॉक्टर आणि परिचारिका यांच्यामुळेच, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. 

बाबूश उवाच...

 50 टक्के मंत्री अकार्यक्षम 
 आरोग्यमंत्र्यांनी स्वत:ची जबाबदारी स्वीकारावी
 कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी तयारी नव्हती
 दुसर्‍या लाटेवेळीही सर्व गृहीत धरले
 आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दोष देणे चुकीचेच
 गोव्याचा मृत्यूदर चिंताजनक
 विश्‍वजित राणे, डॉक्टरांना प्रोत्साहन द्या

विश्‍वजित करतो दिखावा

विश्‍वजित माझा मित्र आहे. पण तो काही करीत नाही. लोकांना दाखवण्यासाठी तो गोमेकॉत जातो. अन्यथा एसीमध्ये बसून असतो. वास्तव स्थिती मात्र वेगळीच आहे, अशी टीका बाबूश यांनी केली.  

शस्त्राशिवाय जवान लढणार कसे?

मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख आहेत. सर्व स्थितीला आरोग्यमंत्रीच जबाबदार आहेत. शस्त्राशिवाय जवान लढणार कसे? हे आरोग्यमंत्र्यांना कळत नाही का? डॉक्टरांना आवश्यक सर्व सुविधा तातडीने द्या. त्यासाठी सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे भांडा, असा सल्ला त्यांनी आरोग्यमंत्र्यांना दिला.

निकृष्ट भोजन

गोमेकॉतील भोजन व्यवस्थेवर बाबूश यांनी टीकास्त्र सोडले. निकृष्ट दर्जाची ही व्यवस्था असल्याचे त्यांचे मत आहे. कोरोनामुळे मी गोमेकॉत दाखल झालो होतो. मला व्हीआयपी रुम दिली होती. मात्र, भोजन म्हणून दिले जाणारे अन्नपदार्थ दर्जेदार नव्हते, असे त्यांनी सांगितले. माझी ही अवस्था असेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.