Mon, Jan 18, 2021 19:33
विश्वजित राणेंचा निर्णय भाजपला धक्कादायक

Last Updated: Jan 14 2021 1:52AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

सत्तरी- मेळावली येथील नियोजित  आयआयटी  प्रकल्पाला  स्थानिकांच्या विरोधाला स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेला उघड पाठिंबा राज्य सरकारला आणि खास करून भाजपला धक्कादायक ठरला.  आगामी निवडणुकीत पराभवाचा धोका असल्याने वाळपईचे आमदार विश्वजित राणे यांनी तब्बल चार महिन्यानंतर या प्रकल्पाला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले.  मेळावलीबाबत घडलेल्या गोष्टीला आपण नव्हे तर राज्य सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता यावर  डॉ. प्रमोद सावंत यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. 

सत्तरीत आयआयटीचा भव्य आणि राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केले होते. त्यावर आयआयटीसाठी जमीन अधिसूचित करण्यास मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब झाल्यावर  राणे यांनी  आपले सर्वात मोठे स्वप्न सत्यात उतरले, अशा शब्दात  आनंद व्यक्त केला होता. सदर प्रकल्प गुळेलीत आणण्याच्या आपल्या शब्दाला मुख्यमंत्री सावंत यांनी मान दिल्याने त्यांनी आभारही मानले.

आंदोलकांच्या सोबत झालेल्या अनेक बैठकीत त्यांना समजवण्यास अपयश आल्यावर,  मुख्यमंत्री सावंत यांनी पुढाकार घेऊन आंदोलकांना पणजीत बोलावून आयआयटीसंबंधी व्हिडिओ सादरीकरण करून समजवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी  मेळावलीला दोनदा भेट देऊनही आंदोलकांना प्रकल्प पटला नाही. यानंतर पोलिसी बळाचा  वापर सुरू झाला. हा संघर्ष राज्याने पाहिला.

आंदोलकांवरील गुन्हे रद्द होणार?

गोवा काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, रिव्होलुशनरी गोवन्सचे नेते मनोज परब आणि 16 अन्य लोकांना पणजीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने अटी घालून जामीन मंजूर केले आहेत. 

आंदोलकांवर खूनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंद केला होता. आता हे गुन्हे रद्द होणार का, पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची होती का, हे सरकार मान्य करणार का, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

पत्राच्या आधारे ‘नथीतून तीर’

विश्वजित राणे यांनी मुख्यमत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून खुद्द सावंत यांनाच कानपिचक्या देण्याचा प्रयत्न केला. या पत्रात आयआयटी प्रकल्प सत्तरीत आणण्याचा विचार केल्याबद्दल मुख्यमत्र्यांचे  राणे यांनी आभार मानले आहेत. स्थानिक लोकांची मते आणि राजकीय अभ्यास केल्यानंतर हा प्रकल्प आणणे चुकीचे असल्याचे सांगून लोकभावनेचा सरकार विचार करीत नसल्याचे राणे यांनी सूचित केले.  सत्तरीत पोलिसांचा वापर करताना  विश्वासात न घेणे, कायदा व्यवस्था बिघडणे या बाबींचा उल्लेख राणेंनी केला, पोलिसांचा  आपल्या  लोकांविरूद्धचा वापर आपणाला आवडलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. याचा अर्थ पोलिसांच्या कायदेशीर कारवाईत आपला हात नसल्याचे धूर्तपणे दाखवून त्यांनी सरकारकडे बोट दाखवले.

मुख्यमंत्र्यांना वेळ नाही

विश्वजित राणे यांनी आयआयटी प्रकल्प रद्द करण्याबाबत दिलेल्या प्रस्तावाबाबत विचार करण्यास आपल्याला सध्या सवड नाही. आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या अपघातामुळे अनेक केंद्रीय मंत्री तसेच नेते राज्यात आल्याने आपण त्यांच्यासोबत असणे महत्त्वाचे आहे.  त्यात श्रीपादभाऊंच्या पत्नी विजया यांचे देहावसान झाल्याने त्यांच्यावरील  अंत्यसंस्कार पार पडल्याशिवाय या प्रस्तावावर विचार करण्यास अवधी नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.