Mon, Nov 30, 2020 13:24होमपेज › Goa › मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तिघे; निर्णय नाहीच!

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तिघे; निर्णय नाहीच!

Published On: Oct 20 2018 1:44AM | Last Updated: Oct 20 2018 1:44AMपणजी : प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या नावाला सत्ताधारी गटातील घटक पक्षांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, सभापती डॉ. प्रमोद सावंत किंवा भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर या तिघांपैकी एकाची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते. मात्र या संदर्भात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी भाजपमधील घटक पक्षाचे नेते व  स्थानिक भाजप नेत्यांशी बुधवारी झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. पण तूर्त  मनोहर पर्रीकर हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असे स्पष्ट संकेत भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत.

दिल्लीत गुरुवारी अमित शहा यांनी विश्‍वजीत राणे, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई आणि मगोचे ज्येष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेतली. शहा यांनी या तिघांची एकत्र भेट न घेता प्रत्येकाची व्यक्तीगत भेट घेत, त्यांच्याकडून राज्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला. सभापती डॉ. प्रमोद सावंत हेदेखील अचानक दिल्लीत धडकल्याने राजकीय चर्चेला उधाण आले. गोव्यात विधानसभेची मध्यावधी निवडणूक होऊ नये, यासाठी भाजपने काळजी घ्यावी. तसेच सर्वांना एकत्र घेऊन उर्वरित कार्यकाळ पूर्ण होईल असा नेता निवडावा, असे आपण अमित शहा यांना सूचविले असल्याची माहिती नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी   दिली.

मगोचे नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी अमित शहा यांच्याशी केलेल्या चर्चेत तूर्त मुख्यमंत्रिपद मनोहर पर्रीकर यांच्याकडेच कायम राहावे, अशी मागणी केली. पर्रीकरांकडील महत्त्वाची खाती त्यांच्या संमतीनेच इतरांकडे देण्यात यावीत आणि पुढील निर्णयाबाबत आघाडी घटकांना विश्‍वासात घेण्यात यावे, असा प्रस्ताव शहांसमोर ठेवला. आघाडी घटकांना सरकारात योग्य पद आणि सन्मान मिळाला, तरच लोकसभा निवडणूक भाजपसाठी सोपी जाईल, असेही आपण शहा यांना सांगितले असल्याचे ढवळीकर म्हणाले. 

दरम्यान, सभापती डॉ. प्रमोद सावंत हे तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने दिल्लीत नेमका काय खल  झाला, याबाबतची उत्सुकता वाढली. राज्यात भाजप आघाडीच्या सरकारला भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी काँग्रेसच्या अन्य काही आमदारांना भाजपात आणण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. काँग्रेसचे काही आमदार गोवा फॉरवर्ड पक्षाशी संधान साधून आहेत, अशीही चर्चा दिवसभर सुरू होती.