Sun, Aug 09, 2020 05:55होमपेज › Goa › धोकादायक वन्य प्राण्यांना उपद्रवी घोषित करण्याचा विचार : मुख्यमंत्री

धोकादायक वन्य प्राण्यांना उपद्रवी घोषित करण्याचा विचार : मुख्यमंत्री

Last Updated: Feb 07 2020 11:24PM

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतपणजी : पुढारी वृत्तसेवा 

माणूस व वन्य प्राण्यांतील संघर्ष टाळण्यासाठी जंगलांत जस्तीतजास्त फळझाडे लावण्याची मोहीम वन खात्यातर्फे हाती घेतली जाणार आहे. पीक उत्पन्न, पाळीव प्राणी व नागरिकांसाठी धोकादायक असलेल्या वन्य प्राण्यांना उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करण्याचा विचारही राज्य सरकारकडून केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी शुक्रवारी विधानसभेत  मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते. वन्य प्राण्यांकडून अनेक ठिकाणी नागरिकांच्या शेतीची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असून  नागरिकांवर हल्ले देखील होत आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात शेतीची नासधूस झाली असून  यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी तसेच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना कृषी खात्याकडून मिळत असलेल्या नुकसान भरपाईत वाढ करण्यात यावी, अशी मागणीही आमदार गावकर यांनी लक्षवेधी सूचनेत मांडली होती. 

मुख्यमंत्री म्हणाले, की वन्य प्राण्यांकडून ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे त्यांना कृषी खात्याकडून अर्थसहाय्य देण्यात येत आहे. जंगलांत झाडांचे प्रमाण कमी झाल्याने खाण्यासाठी काही मिळत नसल्याने वन्यप्राणी गावांत येत आहेत.  त्यावर मात करण्यासाठी जंगल क्षेत्रात विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात येईल. राज्यातील जंगलांच्या सीमा अद्याप  निश्चित झालेल्या नाहीत. सीमा निश्चित झाल्यानंतर वन्य प्राण्यांकडून होणा़र्‍या उपद्रवाच्या प्रश्नावर निर्णय घेता येईल. राज्य सरकार शेतकर्‍यांचे तसेच त्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेणार. 

लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत बोलताना आमदार चर्चिल आलेमाव यांनी वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी वन कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करायला हवी, असे मत व्यक्त केले. राज्य सरकारने  याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, असेही चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.  

आमदार नीळकंठ हळर्णकर, ग्लेन टिकलो यांनी यावेळी वन्य प्राण्यांसाठी जंगलांत फळझाडांची लागवड करावी, अशी सूचना केली. आमदार एलिना साल्ढाणा यांनी यावर उपाययोजना म्हणून शेतकर्‍यांना तारेचे कुंपण बांधून देण्यात यावे, अशी मागणी केली. 

शेतीरक्षणासाठी खाते सक्रिय : कवळेकर 

आमदार प्रसाद गावकर यांनी  विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना कृषिमंत्री बाबू कवळेकर म्हणाले, की वन्यप्राण्यांचा उपद्रव थांबवून शेतीच्या संरक्षण करण्यासाठी कृषी खाते सक्रिय आहे. खात्याकडून शेतीभोवती दगड तसेच तारेचे कुंपण उभारण्यासाठी 75 टक्के अर्थसहाय्य देण्यात येत आहे. तसेच सौरउर्जा कुंपणासाठी 90 टक्के मदत  दिली जात आहे. वन्यप्राण्यांपासून शेतीच्या रक्षणासाठी शेतकर्‍यांना प्रत्येकी 2 लाखांची मदतही देण्यात येत आहे. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली असून यंदाच्या हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही मंत्री कवळेकर यांनी सांगितले.