होमपेज › Goa › मनोहर पर्रीकर स्मृती स्थळाची १३ डिसेंबरला पायाभरणी

मनोहर पर्रीकर स्मृती स्थळाची १३ डिसेंबरला पायाभरणी

Published On: Sep 11 2019 2:29AM | Last Updated: Sep 10 2019 10:20PM

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नियोजित स्मृती स्थळाचा आराखडा.



पणजी : प्रतिनिधी
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथे उभारण्यात येणार्‍या  नियोजित स्मृती  स्थळाची 13  डिसेंबर रोजी  पायाभरणी केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या स्मृती स्थळासाठीचा आराखडा तयार झाला आहे. यू. सी.जे आर्कीटेक्‍चर अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट या कंपनीने हा आराखडा तयार केला आहे. आराखडा निवडीसाठी काल मंगळवारी मुख्यमंत्री  डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांचे 17 मार्च रोजी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर  मिरामार किनार्‍यावर अत्यंसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने   मिरामार येथे पर्रीकर यांचे स्मृती स्थळ उभारण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार पर्रीकरांच्या स्मृती स्थळाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. 13 डिसेंबर म्हणजे पर्रीकर यांच्या वाढदिनी या स्मृती स्थळाची पायाभरणी केली जाणार आहे. गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळा मार्फत या स्थळाचे काम केले जाणार आहे. 

या स्मृती स्थळासाठी आराखडा सादर करण्यासाठी गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाने अर्ज मागवले होते. त्यानुसार महामंडळाकडे 17 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी   पाच जणांची निवड करुन त्यांना सादरीकरण करण्यास सांगण्यात आले होते. मात्र या पाच पैकी  केवळ चार कंपन्यांनीच  स्मृती स्थळासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडयाचे सादरीकरण केले. यात मेसर्स हितेन सेठी असोसिएट, मेसर्स लोकुस डिझाईन प्रा. लि, मेसर्स राहूल देशपांडे अ‍ॅण्ड असोसिएट व  यू. सी. जे आर्कीटेक्‍चर अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट  यांचा समावेश होता. त्यापैकी  यु.सी.जे आर्कीटेक्‍चर अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट  यांनी तयार केलेल्या आराखडयाची निवड करण्यात आली.