Mon, Nov 30, 2020 13:19होमपेज › Goa › खाण घोटाळ्यासंबंधी पीएसी अहवाल हा राजकीय स्टंट

खाण घोटाळ्यासंबंधी पीएसी अहवाल हा राजकीय स्टंट

Published On: Feb 19 2019 1:14AM | Last Updated: Feb 19 2019 1:14AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील कथित खाण घोटाळ्यासंबंधी लोक लेखा समितीचा अहवाल (पीएसी) हा राजकीय स्टंट होता. पीएसी अहवालावरून केवळ जनतेचीच नव्हे तर विधानसभेचीही दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात हक्कभंगाचा ठराव काँग्रेस पक्ष दाखल करणार आहे, अशी माहिती पक्षाचे गोवा प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या  बैठकीत निर्णय घेतला जाईल. खाण घोटाळा झाला होता, तर तो सिद्ध करण्यात भाजपला अपयश का आले, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, राज्यातील खाण व्यवसाय बंद होऊन वर्ष उलटून गेले आहे. मात्र,  सरकार केवळ खाण अवलंबितांच्या भावनांशी खेळत आहे. त्यांना निवडणुकीसाठी  आश्‍वासनांचे गाजर दाखवले जात आहे. खाण प्रश्‍न हा केवळ एका राजकीय पक्षाचा प्रश्‍न नसून तो संपूर्ण  राज्याचा आहे, असेही त्यांनी सांगितले. विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी असताना राज्यातील खाण व्यवसायात 35 हजार  कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका पीएसी अहवालाद्वारे ठेवला. मात्र हा आकडा त्यानंतर कमी होत  गेला, व हा घोटाळा त्यांना सिद्धदेखील करता आला नाही, असे कवळेकर यांनी सांगितले.

सरकार खाण अवलंबितांना केवळ तारखांवर तारखा देत आहे. खाण प्रश्‍नी सरकारने तातडीने तोडगा काढावा. यासाठी काँग्रेस पक्षाचा सरकारला पूर्ण पाठिंबा राहिल. केंद्रात तसेच राज्यात भाजपचेच सरकार असूनही या समस्येवर  तोडगा काढण्यात सरकारला अपयश का येत आहे.  खाण प्रश्‍नी तोडगा काढण्यास अपयश आल्याने सरकारने जनतेची माफी मागावी. तसेच खाणी सुरू होण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जातील,  हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणीही कवळेकर यांनी केली.

खाण अवलंबितांनी 26 फेब्रुवारी रोजी गोवा बंद पुकारला आहे. या बंदला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असणार आहे. याबाबतचा ठराव प्रदेश काँग्रेसने  नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे.

चेल्लाकुमार म्हणाले, पीएसी अहवाल हा केवळ राजकीय स्टंट होता. प्रत्यक्षात त्यातून काहीच  निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पक्षाने पर्रीकर यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पक्षात येत्या काही दिवसांत अन्य राजकीय पक्षांचे नेते दाखल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रवक्ते रमाकांत खलप व अमरनाथ पणजीकर यावेळी उपस्थित होते.