Mon, Sep 21, 2020 04:52होमपेज › Goa › काँग्रेसचे सोळाही आमदार एकसंध

काँग्रेसचे सोळाही आमदार एकसंध

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 04 2018 1:17AMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार एकसंध असून पक्षात फूट पडलेली नाही. काँग्रेस आमदारांचा एक गट  भाजप सरकारला पाठिंबा देणार, ही केवळ अफवा असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू  कवळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 

काँग्रेसचे सर्व आमदार पक्षाशी एकनिष्ठ असून पुढील वाटचालही  एकत्रपणे करणार आहेत. मागील दीड वर्षापासून सर्व 16 आमदार एकत्रितपणे काम करीत असून विधानसभा अधिवेशनातदेखील हे दिसून आले आहे. काँग्रेसचे आमदार भविष्यातदेखील एकसंधच असतील, असा विश्‍वासही कवळेकर यांनी व्यक्त केला.

राज्यातील भाजप सरकार हे व्हेंटिलेटरवर आहे. त्यांचे आमदार तसेच घटक पक्षातील आमदार नाराज असल्याचे त्यांना  ठाऊक असल्यानेच ते भयभीत झाले आहेत. त्यामुळे आपले सरकार वाचवण्यासाठी भाजपच अशा अफवा पसरवत असल्याचेही त्यांनी पत्रकात  म्हटले आहे.

काँग्रेस आमदार दिगंबर कामत, फिलीप नेरी रॉड्रिग्स,  सुभाष शिरोडकर, व टोनी फर्नांडिस हे काँग्रेसमधून बाहेर पडून भाजप सरकारला पाठिंबा देणार असल्याचे वृत्त पसरले आहे. सदर अफवा असून गोमंतकीय जनतेमध्ये  गोंधळ निर्माण करण्यासाठीच भाजप अशा खोट्या बातम्या पसरवत आहे.

सरकारमधील आमदार तसेच मंत्री आजारी असल्याने कार्यकर्ते तसेच अन्य आमदारांकडून विकासकामांसंदर्भात सरकारवर दबाव येत आहे. विकासकामांबाबतच्या  फाईल्स संथ गतीने हाताळल्या जात असल्याची टीकाही कवळेकर यांनी  केली.