पणजी : पुढारी वृत्तसेवा
माजी मुख्यमंत्री (स्व. मनोहर पर्रीकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी महापालिका निवडणुकीवर अखेर मौन सोडले. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मुलाला दिलेल्या उमेदवारीवरून उत्पल यांनी त्यांना अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केले.
आमदार बाबूश यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार यादीत मुलगा रोहितला प्रभाग तीनमधून उमेदवारी दिली आहे. अगोदरच अनेकांना पुन्हा संधी दिल्याने पक्षातून नाराजी व्यक्त होत आहे. माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून गुजरात पालिकेतील उमेदवारीविषयी भाजपचे धोरण काय हे दाखवून दिले आहे. त्यांच्यापाठोपाठ आता उत्पल यांनी सार्वजनिक पदावर राहून कुटुंबातील व्यक्तीला प्रोत्साहित करण्याच्या संस्कृतीने पणजीत प्रवेश केला आहे, असे कोणाचेही नाव न घेता म्हटले आहे.
बाबूश म्हणतात...
उमेदवारीवरून पक्षातून अनेक विरोधकांचा सामना करावा लागला असल्याचे सांगत बाबूश यांनी म्हटले आहे, 30 पैकी एक-दोन ठिकाणी आम्हाला अपयश येऊ शकते. त्या प्रभागाविषयी आत्ताच सांगू शकत नाही.
सिद्धार्थना आठवले गुजरात
पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळीकर यांनीही ट्विटद्वारे भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी गुजरातमध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीची आठवण पक्षाला करून दिली आहे. 60 वर्षांपेक्षा मोठ्या वयाचा उमेदवार असू नये, एकाच कुटुंबात दुसरी उमेदवारी देऊ नये आणि तीनवेळा विजयी झालेल्या उमेदवाराला पुन्हा तिकीट देऊ नये, ही गुजरात भाजपची नियमावली ट्विट केली आहे.