पणजी : प्रतिनिधी
सतत सुरू असलेल्या पावसामुळे पणजी शहराच्या रस्त्यांची परिस्थिती फार वाईट झाली आहे. खड्ड्यांपासून लोकांचा बचाव करण्यासाठी पणजी महानगरपालिकेचे महापौर उदय मडकईकर यांनी आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. लोकांनी पणजीतील खड्ड्यांचे फोटो काढून आपल्याला पाठवावे. हे खड्डे त्वरित काँक्रीट घालून बुजविण्यात येतील, असे आवाहन मडकईकर यांनी सोशल मीडियावर केले आहे.
महापौर मडकईकर यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले, की पणजीतील कुठल्याही रस्त्यावर खड्डे दिसल्यास आपल्या 9881045555 या व्हॉट्सअप क्रमांकावर खड्ड्यांचा फोटो काढून पाठवावा. लोकांकडून पाठविण्यात आलेल्या फोटो व स्थळाच्या आधारे आरएमसीमार्फत पणजीतील खड्डे त्वरित बुजविण्यात येतील.
पणजीचे आमदार आतानसिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, असेही मडकईकर यांनी सांगितले.
या उपक्रमानुसार पणजीतील काही ठिकाणांवरचे खड्डे रविवारी बुजविण्यात आलेले दिसले. यात आल्तिनो, मधुबन कॉम्लेक्स, आप्टेश्वर मंदिर व अन्य काही ठिकाणांवरील खड्ड्यांवर काँक्रिट घालून ते बुजविण्यात आले आहेत.