Sun, Aug 09, 2020 04:33होमपेज › Goa › ‘संजीवनी’कृषी खात्याच्या अखत्यारीत

‘संजीवनी’कृषी खात्याच्या अखत्यारीत

Published On: Feb 19 2019 1:14AM | Last Updated: Feb 19 2019 1:14AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील एकमेव असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना कृषी खात्यांतर्गत आणण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

शेतकर्‍यांच्या मागणीनुसार संजीवनी साखर कारखाना हा कृषी खात्यांतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या कारखान्यातील  मशिनरी जुनी असून, नवी मशिनरी आणली जाईल. या कारखान्यात आमूलाग्र बदल केले जातील, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या दोनापावला येथील खासगी निवासस्थानी सोमवारी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यासंबंधी मंत्र्यांनी वरील माहिती दिली.

क्रीडामंत्री बाबू आजगावकर म्हणाले की, गोवा क्रीडा प्राधिकरण तसेच क्रीडा खात्यात मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या 283 कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  मुख्यमंत्र्यांनी या कामगारांना सेवेत कायम करण्याचे यापूर्वी आश्‍वासन दिले होते. त्यानुसार ते पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पंचायत मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, या बैठकीत काकोडा येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी  400 कोटी रुपये तर   साळगाव येथील कचरा प्रकल्पाच्या विस्तारासाठी  187 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.   

खबरदारी न घेता  वास्कोत होणारी कोळसा हाताळणी  बंद  व्हायला हवी.  कोळसा हाताळणीवेळी प्रदूषण होऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, हे उपाय न करता होणारी बॉक्साईट तसेच कोळसा हाताळणी घातक ठरू शकते, असेही  गुदिन्हो यांनी सांगितले.

मुदतपूर्व निवडणूक नाहीच 

मुदतीपूर्वी गोवा विधानसभा विसर्जित करण्याच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झालीच नाही. त्यामुळे मुदतीपूर्व निवडणुका होण्याचा  प्रश्‍नच येत नसल्याचे यावेळी मंत्री गुदिन्हो, मंत्री सरदेसाई तसेच कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी स्पष्ट केले. 

खाणप्रश्‍नी तोडगा राज्य सरकारकडूनच

 मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  खाणबंदीवर तोडगा केंद्र सरकारने नव्हे तर राज्य सरकारलाच काढावा लागेल, असे सांगितले. मात्र, त्यांनी  हा तोडगा नक्की काय असेल किंवा कशा स्वरुपाचा असेल हे स्पष्ट  केले नाही. खाणप्रश्‍नी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितल्याची माहिती मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली.