Mon, Sep 21, 2020 04:13होमपेज › Goa › नोकर भरतीसाठी पुन्हा मुलाखती घ्याव्यात : शिवसेनेची मागणी

नोकर भरतीसाठी पुन्हा मुलाखती घ्याव्यात : शिवसेनेची मागणी

Published On: Jan 30 2018 1:23AM | Last Updated: Jan 30 2018 1:07AMपणजी : प्रतिनिधी

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या मुलाखतींमध्ये पारदर्शकता नव्हती. मुलाखतींच्या नावाखाली कार्यालयात गोंधळ होता. केवळ 300 ते 350 पदांसाठी दोन हजाराहून अधिक  उमेदवारांना कार्यालयाबाहेर ताटकळत उभे ठेवण्यात आले. त्यामुळे या मुलाखती रद्द करून रितसर पद्धतीने मुलाखती पुन्हा घ्याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते जितेश कामत यांनी पत्रकार परिषदेत केली.

कामत म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात 64  रिक्त पदे भरण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. या पदांसाठी मुलाखत सकाळी 10 वाजता सुरू होणार असल्याने काही उमेदवार पहाटे 5 वाजल्यापासून रांगेत उभे होते. उमेदवारांना सकाळपासून रांगेत ठेऊन दुपारी 12.30 च्या सुमारास मुलाखतीचे उमेदवार निश्‍चित झाल्याचे सांगण्यात आले. हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे.

मुलाखतींसाठी मोठ्या संख्येने आलेल्या उमेदवारांना पाहूनच राज्यात बेरोजगारांची समस्या किती गंभीर आहे हे दिसून येते. सरकार या विषयी असंवेदनशील आहे.  मुलाखतींसाठी रांगेत उभे राहिलेल्या उमेदवारांसोबत पोलिसांचीही गैरवर्तवणूक दिसून आली. उमेदवार नोकरीसाठी आले होते भीक मागण्यासाठी नाही,  असेही कामत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील या पदांसाठी पुन्हा मुलाखती घ्याव्यात. उमेदवारांना  निश्‍चित वेळ देऊन त्यांना बोलावण्यात यावे व प्रामाणिक पध्दतीने मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असेही कामत म्हणाले.