Mon, Sep 21, 2020 05:58होमपेज › Goa › काँग्रेस सत्तेसाठी हपापलेला : पंतप्रधान मोदी

काँग्रेस सत्तेसाठी हपापलेला : पंतप्रधान मोदी

Published On: Apr 11 2019 2:02AM | Last Updated: Apr 11 2019 12:00AM
पणजी : प्रतिनिधी

‘हात की सफाई’दाखवून  फक्त सरकारी खजिना साफ करण्यासाठी आणि कळसूत्री बाहुल्यांचे सरकार रिमोट कंट्रोलद्वारे चालवण्यासाठी   काँग्रेसला सत्ता हवी आहे. काँग्रेस सत्तेसाठी हपापलेला असून त्यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी आहे,  अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील दोन लोकसभा व चार विधानसभा पोट निवडणुकांच्या प्रचारासाठी बांबोळी येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये बुधवारी आयोजित जाहीर विजय संकल्प सभेत केली. वारसा हक्काने पक्षाची धुरा सांभाळता येऊ शकते, मात्र सव्वाशे कोटी जनतेचा विश्‍वास मिळवणे कठीण आहे, असा टोलाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना मोदींनी लगावला. 

जादूगार सरकारलाही लाजवेल,अशी हात की सफाई फक्त काँग्रेसचा पंजा दाखवू शकतो,अशी टीका करून पंतप्रधान मोदी म्हणाले, माजी पंतप्रधान राजीव गांधींनी केलेले  बोफोर्स तोफांच्या व्यवहारासंबंधी केलेले पाप लपवण्यासाठी इतरांवर दलाली घेतल्याचा आरोप काँग्रेस नेते करताहेत.  

काँग्रेसने त्यांच्या राजवटीत बोफोर्सची दलाली खाल्ली, क्वात्रोचीलाही खाऊ दिली. काँग्रेसच्या राजवटीत संरक्षण मंत्रालयाशी निगडीत व्यवहार कधीच कायद्याच्या चौकटीत राहून केले जात नव्हते, बोफोर्स तोफा अन् हेलिकॉप्टर खरेदीतील  दलालीत काँग्रेसचा हात असल्यामुळे अनेक वर्ष शस्त्रास्त्र खरेदी व्यवहार शक्य झाले नव्हते, राफेल प्रकरणातही असाच गोंधळ होईल,असे काँग्रेसींना वाटले होते, मात्र चौकीदार सत्तेत आल्याने त्यांचा डाव फसला आहे. आम्ही देशहिताला बाधा ठरणार्‍या दलालांना पाताळातूनही शोधून काढू,असे सांगून  संरक्षण विषयक खरेदी व्यवहारातील दलालीमागच्या सूत्रधारांचे धागेदोरे जुळू लागले आहेत,असे मोदी म्हणाले.