Thu, Oct 01, 2020 03:12होमपेज › Goa › काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह ४४ जणांना प्रतिबंधात्मक अटक

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह ४४ जणांना प्रतिबंधात्मक अटक

Last Updated: Nov 21 2019 12:18AM
पणजी : प्रतिनिधी 
म्हादईप्रश्नी   पणजी येथील गोवा मनोरंजन संस्थेच्या आवारात निदर्शने करणारे  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  गिरीश चोडणकर यांच्यासह  गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, शंकर किर्लपालकर, ट्रोजन डिमेला तसेच अन्य पदाधिकारी मिळून सुमारे 44 जणांना  काल बुधवारी  पणजी पोलिसांनी  प्रतिबंधात्मक अटक केली.

म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेला पर्यावरण दाखला मागे घेण्यात न आल्याने इफ्फीनिमित्त गोव्यात आलेले पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून  हे आंदोलन करण्यात आले होते.  म्हादई प्रकल्पाला देण्यात आलेला पर्यावरण दाखला त्वरित मागे घ्यावा,  गोमंतकीय जनतेची म्हादईप्रश्नी फसवणूक करू नये, अशी मागणी यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली.

पोलिसांनी राज्यात कलम 144 लागू असल्याने  काँग्रेस पदाधिकार्‍यांना हे आंदोलन न करण्याचा सल्ला दिला. मात्र काँग्रेस पदाधिकार्‍यांनी पोलिसांना  न जुमानता मंत्री जावडेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात करताच पोलिसांनी या सर्वांना  प्रतिबंधात्मक अटक केली. त्यानंतर या सर्वांना पर्वरी पोलिस स्थानकावर नेण्यात आले. 

काँग्रेस प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले,  राज्यात जमावबंदी अर्थात कलम 144 लागू करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 144  कलम हे केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी लावण्यात आले आहे. सदर प्रकार म्हणजे हुकुमशाही आहे.  गोव्यात लागू करण्यात आलेले सदर कलम त्वरीत रद्द करावे अशी मागणी करणारे  निवेदन  राज्यपालांना काँग्रेसतर्फे सादर करण्यात आले होते. मात्र  त्याचीही दखल घेण्यात आली नसल्याची टीका त्यांनी केली.

कर्नाटकला देण्यात आलेला पर्यावरण दाखला मागे घ्यावा. केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर म्हणतात अधिकारी पातळीवर हा पर्यावरण दाखला कर्नाटकला देण्यात आला आहे.  तसे असल्यास जावडेकर हे पत्र मागे का घेत नाही, असा प्रश्न डीमेलो यांनी केला.म्हादईप्रश्नी विविध विधाने करुन केंद्रीय मंत्री जावडेकर व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  टाईमपास  करीत आहे. इफ्फीनिमित्त गोव्यात आलेल्या केंद्रीय मंत्री  जावडेकर यांनी म्हादईप्रश्नी  काहीच भाष्य केले नाही. मग मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत का केले असा प्रश्नही डिमेलो यांनी उपस्थित केला.

दरम्यान ,इफ्फीच्या पार्श्वभूमीवर  काँग्रेसकडून म्हादईप्रश्नी आंदोलन केले जाण्याची शक्यता असल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह पक्षाच्या काही  पदाधिकार्‍यांना आगशी पोलिसांनी 19 नोव्हेंबर रोजी नोटीस बजावली होती. यात  या सर्वांना आंदोलनापासून दूर रहा अन्यथा कारवाईला सामोरे जा,असा इशारा देण्यात आला होता.

 "