Thu, Oct 01, 2020 02:39होमपेज › Goa › खाणप्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य 

खाणप्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य 

Published On: May 25 2019 2:08AM | Last Updated: May 27 2019 1:33AM
फोंडा : प्रतिनिधी

राज्यातील विकासकामे पूर्ण करण्याबरोबरच जनतेच्या समस्या आणि खाण प्रश्‍न सोडवण्याला सरकार प्राधान्य देणार आहे, अशी ग्वाही उत्तर गोव्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीपाद नाईक यांनी दिली.
म्हार्दोळ येथील महालसा देवीचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी श्रीपाद नाईक शुक्रवारी कार्यकर्त्यांसमवेत आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना विकासाचा मुद्दाच भाजपला विजयी करण्यास कारणीभूत ठरला, असे त्यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत पत्नी विजया नाईक, माजी सभापती विश्‍वास सतरकर, सतीश मडकईकर तसेच भाजपचे इतर ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीपाद नाईक म्हणाले, खनिज खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर गोव्यातील खाण प्रश्‍न सोडवण्यात येईल, असे आश्‍वासन मागे दिले होते, या आश्‍वासनानुसार गोव्यातील खाण बंदी सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देताना केंद्र व राज्य सरकार संयुक्‍तपणे गोव्याचा विकास करणार असल्याची ग्वाही उत्तर गोव्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीपाद नाईक यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी मोठा अपप्रचार केला, पण मतदारांनी या अपप्रचाराला मतांच्या रूपात उत्तर दिले आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. त्यासाठी मतदार आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन क्रमप्राप्त आहे. टीका ही होतच असते, पण आपण आपले काम करीत राहणे आवश्यक असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर तसेच संपूर्ण गोव्याचा सर्वांगीण विकास केला जाईल, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

दक्षिण गोव्यातील माजी खासदार नरेंद्र सावईकर पराभूत झाले यासंबंधी विचारल्यावर काही चुका झाल्या, त्यामुळे हा प्रकार घडला असून यापुढे त्या चुका सुधारण्यात येणार असून गोव्यात भाजपच निर्विवाद असेल, असे श्रीपाद नाईक म्हणाले. प्रियोळचे माजी आमदार तथा माजी सभापती विश्‍वास सतरकर यांनी प्रियोळ मतदारसंघातील मतदारांचे अभिनंदन करताना लोकसभेसाठी प्रियोळ मतदारसंघातून भाजपला भरीव मते मिळाली असून राज्यात लोकसभेत भाजपला आघाडी मिळवून देणारा प्रियोळ हा दुसरा मतदारसंघ असल्याचे नमूद केले.