Mon, Sep 21, 2020 05:29होमपेज › Goa › खाणी सुरू करण्याच्या प्रयत्नांना क्‍लाउड अल्वारिसकडून अडथळा

खाणी सुरू करण्याच्या प्रयत्नांना क्‍लाउड अल्वारिसकडून अडथळा

Published On: Dec 14 2018 1:45AM | Last Updated: Dec 13 2018 11:54PM
मडगाव : प्रतिनिधी

काँग्रेस सरकारच्या काळात कायदेशीरपणे खनिज व्यवसाय चालला असता तर आज क्लाउड अल्वारिसच काय तर सर्वोच्च न्यायालयालासुद्धा  राज्यातील खनिज व्यवसाय बंद करता आला नसता. भाजप सरकारने जेव्हा जेव्हा कायदेशीर मार्गाने खाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्या-त्यावेळेला क्लाउड यांनी न्यायालयात धाव घेऊन खाणी बंद करण्याचे काम केले आहे. यावेळी कायद्यात बदल करून खाणी सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्याला अडथळा आणण्याचे काम क्लाउड अल्वारिस करणार आहे. त्यामुळे त्यांचा  बहिष्कार करण्याशिवाय पर्याय नाही. क्लाउड यांना समर्थन देऊन काँग्रेस पक्षाला राज्यात खाणी सुरू झालेल्या नको हे स्पष्ट होते, अशी टीका वीज मंत्री नीलेश काब्राल केली.

क्‍लाउड यांना गोव्याबाहेर फेकण्याचा काब्राल यांच्या वक्‍तव्यावरून त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन पोलिस तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. काब्राल यांनी दिल्लीत रामलीला मैदानावर खाण अलबितांच्या सभेत क्लाउड यांना बाहेर फेकण्याचे वक्तव्य केले होते.याविषयी काब्राल यांना विचारले असता मूळ काँगेस पक्षालाच राज्यात खनिज व्यवसाय सुरू झालेला नको आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस सरकार सत्तेत असताना कायदेशीर मार्गाने खाणी चालल्या असत्या तर आज खाण बंदीची पाळी आली नसती.राज्यातील खाण अवलंबितांवर आज उपासमारीची पाळी येण्यास सर्वस्वी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, असे काब्राल म्हणाले.

काँग्रेसच्या काळात झालेल्या अंधाधुंद खाण उद्योगामुळे 2012 ला सर्वात प्रथम खाण व्यवसाय बंद पडला होता.भाजप सरकारने सर्व प्रकारचे दाखले मिळवून अथक प्रयत्नानंतर 2015 मध्ये पुन्हा खनिज व्यवसाय  सुरू केला. पण क्लाउड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन खाणी पुन्हा बंद पडल्या, असे काब्राल म्हणाले.

सरकारने डिस्ट्रिक्ट मिनरल फंडच्या वितरणासाठी दोन्ही जिल्ह्यात दोन जिल्हास्तरीय समित्या स्थापन केल्या होत्या. दक्षिण गोवा समितीवर सरकारने आपली निवड केली होती. दोन्ही जिल्ह्यातील खाणग्रस्त भागात या निधीचे कशा  प्रकारे वितरण करून खाण अवलंबितांना त्याचा लाभ करून दिला जावा, याबाबत आपण अभ्यास केला होता. खाण भागातील विध्यार्थ्यांना बस सेवा, लोकांना वाहतूक सेवा, पाण्याचे वितरण अशा सर्व मूलभूत गोष्टींचा त्यात समावेश होता. क्‍लाउड अल्वारिस यांना तेही खटकू लागले आणि त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन दोन्ही समित्या बरखास्त करायला लावल्या. शिवाय दोन्ही समित्यांच्या अध्यक्षांना काढून टाकले. क्लाउड  नेमके काय करू पाहत आहे हे समजत नाही, असे नीलेश काब्राल यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

आता केंद्र सरकारच्या मदतीने कायद्यात बदल करून खाणी सुरू करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न असून यातही क्लाउड अडथळा आणणार यात शंका नाही. त्यामुळे त्याला बाहेर काढले, असे वक्‍तव्य आपण केले होते व त्यावर आपण ठाम  आहोत, असेे काब्राल म्हणाले.

क्लाउड यांना पाठिंबा देऊन काँग्रेस पक्षाने खाणींचा बाबतीत आपला दुटप्पीपणा दाखवून दिला आहे. आपल्यावर टीका करून त्यांना राज्यात खाण व्यवसाय सुरू करू द्यायचा नाही हे त्यांनी दाखवून दिले, आहे असे काब्राल म्हणाले.

काँग्रेसचा अल्वारिसांना पाठिंबा
  एकीकडे काँग्रेस पक्षाचे नेते खाणी सुरू करण्यासाठी दिल्लीत येऊन भाषणे देत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गोव्यात खाण विरोधी भूमिका मांडत आहेत. काँग्रेस पक्षाचा क्लाउड अल्वारिस यांना पाठिंबा असल्याचे दिसून येत असल्याचे वीजमंत्री काब्राल म्हणाले.