Mon, Sep 21, 2020 05:10होमपेज › Goa › गोव्याच्या भवितव्यासाठी राजकारण्यांचे संकल्प 

गोव्याच्या भवितव्यासाठी राजकारण्यांचे संकल्प 

Published On: Dec 31 2018 1:49AM | Last Updated: Dec 31 2018 1:49AM
मडगाव : प्रतिनिधी 

सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी राज्यातील प्रत्येक व्यक्ती उत्साहात आहे. गोव्याच्या भविष्यासाठी व गोव्याच्या विकासासाठी मंत्री, आमदारांनी अनेक संकल्प केले आहेत. सकारात्मक विचारातून  गोव्याला पुढे घेऊन जाता येईल, असे  नगरविकास मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. तर  राज्याला अखंडित वीज पुरवठा प्राप्त देण्याचा संकल्प वीज मंत्री निलेश काब्राल यांनी केला आहे. 

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा संकल्प केला असून शहराला एक नवीन स्वरूप प्राप्त करून देण्याचा संकल्प केला आहे. तसेच कला व सांस्कृतिक खात्याने मंत्री गोविंद गावडे यांनी आपल्या अंतर्गत असलेल्या प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र संकल्प घेतले आहे.  मंगळवारपासून  2019 ची पहाट उजाडणार असून नववर्षाची सकाळ, नवे संकल्प घेऊन येणार आहे. मंत्री, आमदारांना पावलोपावली जनतेच्या भविष्याची चिंता सतावत असून त्यांनी नववर्षात अनेक प्रकल्प उभारून व रखडलेली कामे मार्गी लागण्याचा संकल्प केला आहे. यावेळी पुढारीशी बोलताना मंत्री विजय सरदेसाई म्हणाले की, मडगाव येथे प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेले कब्रस्थान व फातोर्डा मडगाव बस टर्मिनल हे दोन प्रकल्प येत्या वर्षात उभारण्यास सुरुवात होणार आहे. तसेच कित्येक वर्षांपूसन संत गतीने चालू असलेले जिल्हा इस्पितळाचे बांधकाम येत्या वर्षात पूर्ण करून त्याचे लोकार्पण होतील.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी आर्लेंम ते रवींद्र भवन येथील मार्गाचे रुंदीकरण करून चांगला व सुरक्षित मार्ग तयार करण्यात येणार आहे. हे सरकार गोंयकारपण जपणारे आहे. नगरविकास आणि कृषी खात्याच्या माध्यमातून जनतेला जास्तीत जास्त सेवा पुरविण्यास आपण कटीबद्ध आहे. वर्षाच्या 365 दिवसांसाठी कम्युनिटी फार्मिंग व शिवयोग कृषीच्या माध्यमातून ऑरगॅनिक फर्मिक करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. मडगाव व फतोरडा परिसरातील सर्व वारसा स्थळांची व जुन्या पोर्तुगीजकालीन घरांची डागडुजी करून ओल्ड मार्केट ते बोर्ड मार्गावर सौंदर्यीकरण करून संपूर्ण स्वरूप बदलण्यात येणार असून फतोरडा दवंडे येथे भव्य प्रवेशद्वार (मोठा आर्क) उभारण्यात येणार असल्याचे सारदेसाई म्हणाले. 

वीजमंत्री नीलेश काब्राल यावेळी म्हणाले, संपूर्ण गोव्याला अखंडित वीज देणे हे येत्या वर्षाचे मुख्य ध्येय असून या खात्यात काम करणारे कोणत्याच प्रकारचे भ्रष्टाचार  करणार नाही याचीही खात्री बाळगली जाईल. तसेच कुडचडे मतदारसंघात नगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, इस्पितळ व स्पॉट्स कॉम्प्लेक्स यावेळी उभारण्यात येणार असून यांचे येत्या वर्षात लोकार्पण करण्यात येतील, असे काब्राल म्हणाले. 

 आणि संस्कृती मंत्री तथा आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री तथा नागरी पुरवठा मंत्री  गोविंद गावडे  यांनी सांगितले, त्यांच्याकडे सरकारच्या तीन खात्याची जबाबदारी असून प्रत्येक खात्यात नावीन्य आणून त्यात भ्रष्टाचार कधीच होऊ देणार नसल्याचा हा नववर्षाचा संकल्प आहे. आदिवासी कल्याण खात्याच्या अंतर्गत आदिवासी लोकांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देऊन देण्याचा प्रयत्न राहणार असून आदिवासी मुलांना शिक्षण प्राप्त करताना कोणत्याच अडचणी येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. मडगावचे आमदार दिगंबर कामत म्हणाले, यावर्षी मडगाव शहरात अनेक विकासकामे हातात घेतली असून शहारत चांगले व सुरक्षित रस्ते तयार करण्यात येतील. येत्या वर्षाच्या प्रारंभी अपोलो इस्पितळात ते पावर हाऊस सर्कलपर्यंत संपूर्ण रिंगरोडच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. साडे तीन कोटी रुपयांचा हा प्रकल्प असणार असून संपूर्ण रस्त्याचा कायापालट होणार आहे.