Sun, Sep 20, 2020 08:48होमपेज › Goa › रस्त्यातील खड्ड्यांबाबत उच्च न्यायालयात याचिका

रस्त्यातील खड्ड्यांबाबत उच्च न्यायालयात याचिका

Published On: Sep 28 2019 1:20AM | Last Updated: Sep 28 2019 1:20AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील रस्त्यांवर खड्डे पडले असून रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. याप्रश्नी त्वरीत हस्तक्षेप करावा, अशी मागणी करुन आम आदमी पक्षाचे नेते दत्तात्रय उर्फ प्रदीप पाडगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमावा, रस्ते देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराला द्यावी, अशी विनंती या याचिकेत केली आहे.

याचिकेच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी सुनावणीवेळी सरकारला नोटीस बजावून बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवरील पुढील सुनावणी सोमवार 30 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. राज्यातील बहुतेक रस्त्यांवर खड्डे पडले असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष करुन दुचाकी चालक तसेच पादचार्‍यांना अधिक धोका संभवतो आहे. सरकारी यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याचे या जनहित याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

गिरी म्हापसा येथील रस्त्यावर तसेच नव्या जुवारी पुलाचे काम सुरु असल्याने कुठ्ठाळी मार्गांवर रोज प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. या भागातील रस्त्यांचीदेखील दुर्दशा झाली असल्याने लहान-मोठे अपघात याठिकाणी घडतात. गिरी-करासवाडा मार्गावरील खड्ड्यांमुळे संतोष गवंडी या व्यक्तीचा अपघातात बळीदेखील गेला असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले असून या रस्त्यांचा अभ्यास करण्यासाठी आयोगाची नेमणूक करावी. न्यायालयाने या प्रश्नी हस्तक्षेप करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही या जनहित याचिकेत करण्यात आली आहे.