Mon, Sep 21, 2020 05:19होमपेज › Goa › गोवा : भाजपकडून सभापती पदासाठी पाटणेकर; अर्ज केला दाखल

गोवा : भाजपकडून सभापती पदासाठी पाटणेकर; अर्ज केला दाखल

Published On: Jun 03 2019 12:22PM | Last Updated: Jun 03 2019 12:36PM
पणजी : प्रतिनिधी

गोवा राज्य विधानसभेच्या सभापती पदासाठी  ‘एनडीए’तर्फे डिचोलीचे आमदार  राजेश पाटणेकर यांचे नाव सोमवारी (ता.३.) निश्चीत करण्यात आले. पाटणेकर यांनी आज दुपारी  विधानसभा सचिवांच्‍यासमोर सभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. 

भाजप गाभा समितीची आज सकाळी झालेल्या बैठकीत सभापतीच्या नावाविषयी चर्चा करण्यात आली. सभापतीसाठी राजेश पाटणेकर, शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर आणि मयेचे आमदार प्रवीण झांट्ये अशा तीन नावांमध्ये शर्यत होती. यातील पाटणेकर यांच्या नावाला समितीने एकमताने पसंती दिली.

पाटणेकर हे 55 वर्षीय असून ते 2002-07 , 2007- 12 आणि 2017 सालच्या विधानसभा निवडणूकीत डिचोली मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी खादी ग्रामोध्योग मंडळाचे अध्यक्ष, सार्वजनिक लेखा समितचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून ते सध्या गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आहेत.

सभापतीपदासाठी भाजपतर्फे डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. उद्या विशेष अधिवेशनात  सभापतींची निवड होणार आहे.  मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा फॉरवर्डचे नेते कृषि मंत्री विजय सरदेसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर अर्ज दाखल करताना उपस्‍थित होते.