Mon, Sep 21, 2020 06:02होमपेज › Goa › 'सुरक्षा तपास तंत्रज्ञान' कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात पर्रीकर अपयशी 

'सुरक्षा तपास तंत्रज्ञान' कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात पर्रीकर अपयशी 

Published On: Feb 23 2019 8:32PM | Last Updated: Feb 24 2019 12:52AM
मडगाव : प्रतिनिधी

गोवा पॉलिटेक्निक तंत्र निकेतनात 'सुरक्षा तपास तंत्रज्ञान' कोर्स पूर्ण केलेल्या तरुणांना अश्वासनानुसार नोकरी पुरविण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अयशस्वी झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्वरित सेल तयार करून तरुणांना समाविष्ट करावे नाहीतर त्यांना दुसऱ्या जागी नोकरी द्यावी अशी मागणी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेंसो यांनी केली. 

काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा पॉलिटेक्निक तंत्र निकेतनात 'सुरक्षा तपास तंत्रज्ञान' कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना तपास सेल सुरू करून त्यात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. कोर्स संपून दहा वर्षे झाली तरीही या विद्यार्थ्यांना कुठलीही नोकरी देण्यात आली नसून या तरुणांवर अन्याय केल्याचा आरोप रेजिनाल्ड यांनी केला.  सलग तीन वर्षे कोर्स पूर्ण केलेली एकूण ३६ विद्यार्थी पर्रिकरांच्या या आश्वासनाना बळी पडलेले आहेत. पर्रिकरांनी कामापूरती आश्वासने देऊन मागाहून जनतेचा घात करू नये असेही ते म्हणाले. 

एखादा कोर्स सुरू करणे म्हणजे तरुणांना नोकरी देण्याचा मार्ग खुला करणे असे आहे. शिवाय यामुळे शिक्षक तसेच साधनसुविधासाठीही भरपूर खर्च केला जातो. पर्रिकरांनी निवडणूकां डोळ्यासमोर ठेवून हा कोर्स सुरू केला होता असा आरोप त्यांनी केला. कोर्स केलेले सर्व तरुण गोमंतकीय असून गोय गोयकार गोयकारपणाची भाषा करणाऱ्या सरकारने या सर्व तरुणांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.