Thu, Oct 01, 2020 03:14होमपेज › Goa › विष्णू वाघांच्या मृत्यूची चौकशी करा : रामराव वाघ

विष्णू वाघांच्या मृत्यूची चौकशी करा : रामराव वाघ

Published On: Feb 14 2019 3:40PM | Last Updated: Feb 14 2019 3:40PM
पणजी : प्रतिनिधी

माजी उपसभापती विष्णू वाघ यांच्या दक्षिण आफ्रीकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला मृत्यू हा संशयास्पद आहे. त्याची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांचे बंधू  प्रा. रामराव वाघ यांनी केली आहे. भावाच्या मृत्यूबाबत अद्याप आपणास कोणी अधिकृतरीत्या कळवलेही नाही असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, काल रात्री पत्रकारांनीच मला दूरध्वनीवर विष्णू यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मी वाघ यांच्या संपर्कात असणाऱ्यांकडे आणि त्यांच्याकडे कामाला असणाऱ्यांकडे चौकशी केली. त्यापैकी एकाने ८ रोजीच आपणास समजले होते पण कोणाला सांगू नको असे बजावले होते. तर दुसऱ्याने ११ रोजी मृत्यू झाला, असे सांगितले. त्यावेळी एका नातेवाईकासह जाऊन ढवळीच्या बंगल्यात साफसफाई केल्‍याचे सांगून त्यावेळी तो नातेवाईक हळू आवाजात मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असल्‍याचे सांगितले. विष्णू यांना दक्षिण आफ्रिकेत नेताना त्यांची प्रकृती ठीक नव्हती, तर  विदेशात नेण्याचा निर्णय कोणी व का घेतला याची चौकशी होणे आवश्यक आहे असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

तसेच या प्रकरणाची सरकारकडे मागणी करायची की पोलिसात तक्रार करायची याचा निर्णय आम्ही कुटुंबीय आज सायंकाळपर्यंत घेणार आहोत. त्याबाबत आम्ही चर्चा करत आहोत. जोहान्सबर्ग येथे अशी कोणते वैद्यकीय उपचार केले जाणार होते याचीही चौकशी झालीच पाहिजे. याशिवाय विष्णू यांचा मृत्यू कशामुळे झाला व मृत्यू झाल्याचे पाच दिवस दडवून का ठेवले हे सारे संशयास्पद आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे. अशी भूमिका रामराव वाघ यांनी मांडली आहे.