Mon, Apr 12, 2021 02:53
रुग्णालये फुल्‍ल; प्रशासनाची धावपळ

Last Updated: Apr 09 2021 2:58AM

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कोरोनाचा संसर्ग जनतेमध्ये पुन्हा भीती निर्माण करीत आहे. एकाच दिवशी 527 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. गेल्या चोवीस तासांत 58 आणि 57 वर्षीय पुरुषांचा गोमेकॉत मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 858  झाली आहे. पणजी, कांदोळी, पर्वरी, मडगाव, फोंडा येथील आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात 200 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. सक्रिय रुग्ण वाढल्याने इस्पितळे पुन्हा भरू लागली असून, प्रशासनाची सुविधा निर्माण करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. 

यासंदर्भात बुधवारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोमेकॉतील विभागप्रमुखांची बैठक घेतली. शिवाय यावेळी त्यांनी गोमेकॉतील कोरोना  विभागाची पाहणी केली. उत्तर आणि दक्षिण गोव्यात इस्पितळात खाटांची संख्या वाढविली जात आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात 300 खाट वाढविण्यात येत आहेत. कोरोना निगा केंद्र  म्हणून पूर्वी कार्यरत असणारे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम पुन्हा रुग्णांसाठी तयार केले जात आहे. 

रिकव्हरी रेट घसरला 

मागील आठवड्यात कोरोनाची स्थिती गंभीर नव्हती. 30 मार्चला राज्यात 127 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. यावेळी रुग्ण बरे होण्याचा दर 96.11 टक्के होता. सध्याची रुग्णांची संख्या या तुलनेत 400 रुग्णांनी अधिक आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर 93.86 टक्क्यांवर आला आहे. 

फोंड्यात दिवसभरात 40 नवे रुग्ण भर 

फोंडा : फोंडा तालुक्यात  बुधवारी  एकूण चाळीस रुग्णांची भर पडली. गेल्या शनिवारी फोंड्यात एकाचा आणि बुधवारी सकाळी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात कोरोना रुग्णांचा आकडा 217 वर पोहोचला आहे.  तालुक्यात सक्रीय रुग्णांची संख्या तिनशे झाली आहे. 

पणजीतील स्थिती चिंताजनक

राजधानी पणजीत स्थिती अधिक चिंताजनक आहे. तीन खासगी हॉटेल, गोमेकॉ, बिल्डर्सची कार्यालये, पणजी बाजारपेठ, संस्था यासारख्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत. 

लस घ्या : आरोग्यमंत्री राणे

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लोकांनी मास्क घालावा,  सुरक्षित अंतर ठेवणे खूप गरजेचे आहे. जे नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत, त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केले आहे.

शेळपे येथे 21 कामगारांना कोरोना
सांगे: पुढारी वृत्तसेवा 

सांगेच्या शेळपे औद्योगिक वसाहतीतील शीतपेय निर्मिती  करणार्‍या वरुण ब्रेवरेज प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यातील 21 कामगारांना  कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रुचिका कट्याल यांनी बुधवारी संबंधित परिसराला मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले.

कामगारांना कोरोना झाल्याची माहिती सांगे येथील उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी  जिल्हाधिकारी कट्याल यांना दिली. त्यानंतर  आदेश जाहीर झाला. कोरोना पॉझिटिव्ह आलेले  दोन कामगार मडगाव,
 एक फोंडा, आणि एक कामगार केपे येथे राहणारा आहे. त्यांना होम आयसोलेशनची परवानगी दिली आहे.  त्यांचा प्रतिदिन वैद्यकीय अहवाल घेण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी कट्याल यांनी या भागातील उपजिल्हाधिकार्‍यांना केलेल्या आहेत. 

जिल्हाधिकारी कट्याल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, तो संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी सांगे नगरपालिका व अग्निशमक दलाला दिली आहे. या परिसरात  गर्दी होणार नाही, याची  दक्षता घेतली आहे. हा परिसर  बंद करून येथे पोलिसांनी पहारा द्यावा, अशी सूचना सांगे पोलिसांना केली आहे.