Wed, May 19, 2021 04:01
विरोधकांचा सरकारवर हल्‍लाबोल

Last Updated: May 05 2021 2:24AM

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत  आहे. निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यामध्ये सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. प्रशासनही ठप्प झाले आहे. सरकारने पंधरा दिवसांचा कठोर लॉकडाऊन जाहीर करावा, अन्यथा सत्ता सोडावी, असा हल्लाबोल विरोधकांनी मंगळवारी केला.

राज्यात सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सरकार चालविणे झेपत नसल्यास मुख्यमंत्री पदावरून त्वरित पायउतार व्हावे, असे आव्हान विरोधकांनी दिले. राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्याच्या सीमा बंद कराव्यात, तसेच आपत्कालीन सेवेसाठी परराज्यातून येणार्‍यांची आरटी-पीसीआर चाचणी सक्‍तीची करावी, अशी मागणीही विरोधकांनी केली. पर्वरीतील सचिवालयात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी गटातील आमदारांची बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे आमदार प्रतापसिंग राणे, लुईझिन फालेरो, मगोचे सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डेचे विजय सरदेसाई, जयेश साळगांवकर, विनोद पालयेकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे व प्रसाद गांवकार उपस्थित होते.

राज्यात सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू असून 15 मेपासून तिसरी लाट येणार आहे. तरी सरकार कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणू शकले नाही. सरकारने पूर्णपणे लॉकडाऊन करून कोविडच्या आजाराला बळी पडणार्‍यांचे प्राण वाचविण्याची गरज आहे. या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवावी. औषधालये, सरकारी वैद्यकीय सेवा, सरकारी वाहने सुरू ठेवावी. परराज्यातून येणार्‍या पर्यटकांना कडक निर्बंध लागू करावेत. आरटी- पीसीआर अहवाल पॉझिटिव्ह असलेल्यांना प्रवेश देऊ नये, अशा मागण्या विरोधकांनी सरकारकडे केल्या.

सरकारी इस्पितळांत खाटांची संख्या वाढवून औषधोपचार व साधनसुविधेत वाढ करावी. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील वरचे दोन मजले विनावापर आहेत. ते मजले कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरावेत. बांबोळीत सुपर स्पेशियलिटी इस्पितळ त्वरित सुरू करावे. विविध ठिकाणी विनावापर असलेली खासगी इस्पितळे भाडेपट्टीवर घेऊन कोविड इस्पितळे सुरू करावीत. खासगीतील हॉटेल्स, डोर्मेटरीस कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी घ्यावीत. सर्व आरोग्य केंद्रात लसी उपलब्ध करून देण्याबरोबर लोकांच्या चाचण्या  सुरू ठेवाव्यात. सरकारी इस्पितळांत व्हेंन्टीलेटर्स व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवावा. कोविडच्या सर्व इस्पितळांत रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी पीआरओची नियुक्‍ती करावी. सरकारने कोविडच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णांना केलेला ऑक्सिजन, औषध पुरवठा व इतर उपचाराबद्दलची श्‍वेतपत्रिका जाहीर करावी, या मागण्याही विरोधकांनी केल्या आहेत.

धक्‍कादायक... 52 जणांचा मृत्यू 

पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. 52 जणांचा मंगळवारी मृत्यू झाला. 2 हजार 814 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. रुग्ण बरे होण्याचा आकडासुद्धा वाढत असून 1 हजार 870 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 26 हजार 731 इतकी आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये 40 पेक्षा कमी वय असेलल्या चौघांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 1 हजार 372 मृत्यूंची नोंद झाली आहे. 
मंगळवारी गोमेकॉ - 28, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ - 14, दक्षिण गोवा खासगी इस्पितळ - 2, चिखली आरोग्य केंद्र - 1, कुडचडे - 1, लोटली - 1, इएसआय-1 आणि बाळ्ळी आरोग्य केंद्रात एकाचा मृत्यू झाला आहे. 
राज्यातील ग्रामीण भागालासुद्धा कोरोनाचा विळखा घट्ट बसला आहे. वाळपई, पेडणे, बेतकी, खोर्ली, शिवोली, चिंबल, कासवाली, मेरशी या आरोग्य केंद्रामध्ये 500 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. मागील महिन्यांमध्ये याच आरोग्य केंद्रात 50 पेक्षा कमी रुग्ण होते. 

गोवा वैद्यकीय महाविद्यालयसह दक्षिण गोवा इस्पितळ आणि ईएसआय इस्पितळातसुद्धा कोरोनाच्या रुग्णांसाठी खाट वाढविले आहेत. गोमेकॉमध्ये 250 पेक्षा अधिक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 

यांचा मृत्यू झाला 

मंगळवारी ज्यांचा मृत्यू झाला त्यातील महिलांमध्ये वेर्णा (38), केपे (58), बार्देश (67), आके (65), वेळ्ळी (62), पर्वरी (63), फोंडा (79), पर्रा (65), खोर्ली (75), वास्को (54), दोनपावला (36), म्हर्दोळ (56 ), मडगाव (51), खांडेपार (60), शिवोली (83), दाबोळी (64) यांचा समावेश आहे. पुरुषांमध्ये करमळी (68), टाळगाव (78), केपे (65), शिरोडा (64), चिंचेनी (80), चिखली (41), नावेली (67), काणकोण (63), सावर्डे (55), वास्को (57), कुठ्ठाळी (48), म्हापसा (63), नुवे (60), कुंकळ्ळी (75), वेळ्ळी (38), गोघळ (86), उसकई (65), धुळेर (80), नावेली (46), कांसा (64), तिसवाडी (48), मुरगाव (54) , पेडणे (76), म्हापसा (60), फोंडा (52), वाळपई (72), पणजी (79) मडगाव (60), हळदोणा (60) पणजी (92) हडफडे (79), वास्को (44 आणि 78) यांचा समावेश आहे.