Fri, Feb 26, 2021 06:38
कुमारी मातांविषयी ना सर्व्हे; ना आकडेवारी

Last Updated: Feb 24 2021 2:31AM

पणजी : तेजश्री कुंभार

कुमारी मातांचे आणि त्यांच्या मुलांचे पुढे काय होते, याची माहिती देणारी कोणतीही आकडेवारी अथवा सर्व्हे राज्यात नाही. यासंदर्भात पोलिस खाते, महिला आयोग आणि राज्यातील अशासकीय संस्थांशी संवाद साधल्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले. या आस्थापनांच्या मते, राज्यात कुमारी माता आहेत; मात्र त्यांची संख्या, सद्य:स्थिती, त्यांच्या मुलांची स्थिती याबाबत कोठेही, कोणतीही नोंद नाही.

यासंदर्भात पणजी पोलिस खाते तसेच राज्यात गुन्हे अन्वेषण विभागात विचारणा केली असता पोलिस खात्यात तक्रार घेताना महिला लग्न झालेली आहे की, नाही याबाबत नोंद केली जात नाही, अशी माहिती देण्यात आली. बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेला नंतर गर्भधारणा झालेली आहे किंवा नाही, याबाबत माहिती ठेवली जात नसल्याचे सांगण्यात आले.

2020 मध्ये काँग्रेसच्या नेत्या अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी महिला आयोगात एका कुमारी मातेबद्दल जाहीर तक्रार करीत तिला न्याय मिळवून दिला होता. काही वर्षांपूर्वी मडगावमध्ये एका मुलीला असेच फसवून मुलाने दुसरे लग्न केल्याची घटना समोर आली होती. सामाजिक अभ्यासकांच्या मते अशा अनेक घटना राज्यात घडत आहेत, मात्र घटनांकडे दुर्लक्ष केले जाते, मग नोंद सरकारी योजना हवीच कुमारी मातांशी लग्न करण्यास कोणीही तयार होत नाही. यांच्या मुलांनापण कालांतराने वडिलांच्या नावावरून, आईच्या चारित्र्यावरून  मानसिक त्रास दिला जातो.  या मातांना आधार देणारी योजना गरजेची असल्याचे पणजीतील ‘बायलांचो साद’ संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सबिना मार्टीन्स म्हणाल्या.

1 ते 2 टक्के प्रमाण

मडगावातील ‘बायलाचो एकवोट’च्या अध्यक्षा आवदा व्हीएगस म्हणाल्या, एकूण महिलांच्या तुलनेत कुमारी मातांचे प्रमाण 1-2 टक्के असेल.  या मुलींचे आयुष्यभर हाल होतात. एक तर त्यांना न्यायालयाच्या वार्‍या कराव्या लागतात. अन्यथा सर्व स्वीकारून अन्याय सहन करून गप्प बसावे लागते.

जबाबदारीची भीती

2020 मध्ये आगशी आणि पणजी येथे दोन अर्भके मृतावस्थेत आढळली. हे प्रकार कुमारी मातांकरवीच केले जातात. याला आजूबाजूची परिस्थिती कारणीभूत असते. समाजाकडून बहिष्कृत होण्याची भीती वाटत असल्याने असे प्रकार सवेरा संस्थेच्या संस्थापक तारा केरकर म्हणाल्या.