Sun, Sep 20, 2020 10:23होमपेज › Goa › राष्ट्रवादी काँग्रेस पोटनिवडणुका लढवणार

राष्ट्रवादी काँग्रेस पोटनिवडणुका लढवणार

Published On: Nov 16 2018 1:26AM | Last Updated: Nov 15 2018 11:43PMपणजी : प्रतिनिधी

लोकसभेसाठी उत्तर गोवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडणूक लढविणार आहे. मांद्रे आणि शिरोडा  विधानसभा पोटनिवडणुकीच्या  दोन्ही जागा लढविणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझेे फिलिप डिसोझा यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या युवा अध्यक्षपदी सतीश नारायणी यांची निवड करण्यात आली. अनिल जोलापुरे, संजय बर्डे, राजन साटेलकर  व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  

डिसोझा म्हणाले, की राज्यात पक्षाचे कार्य वाढविण्यात येणार असून पक्षातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. लवकरच राष्ट्रवादीच्या महिला गट अध्यक्षांचे नावही जाहीर करण्यात येणार आहे. पक्ष मधल्या काळात मागे राहिला होता. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात बळकट  करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिरोडा व मांद्रे मतदारसंघात पक्षाचे काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत  गोव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर या विषयी चर्चा सुरू आहे.

सतीश नारायणी  म्हणाले, की युवा अध्यक्ष या नात्याने आपण चाळीसही मतदारसंघात युवकांना संघटित करण्यासाठी कार्य सुरू करणार आहे.  युवकांसाठी नवीन वेबसाईट सुरू करण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पर्रीकरांनी मुख्यमंत्रिपद दुसर्‍यांला द्यावे

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर लवकर बरे व्हावे व त्यांनी राज्याचा कारभार पहावा, असे आम्हालाही वाटते. परंतु,  पर्रीकर आजारी असताना त्यांना पद सांभाळण्यासाठी बळजबरी करू नये. पर्रीकरांच्या आजारपणामुळे राज्यकारभार सुरळीत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कृतज्ञतापूर्व राजीनामा देऊन मुख्यमंत्रीपद दुसर्‍याला द्यावे, असे जुझेे फिलीप डिसोझा यांनी सांगितले.