Mon, Sep 21, 2020 04:47होमपेज › Goa › मोदीच देणार मजबूत सरकार : अमित शहा

मोदीच देणार मजबूत सरकार : अमित शहा

Published On: Feb 10 2019 1:02AM | Last Updated: Feb 09 2019 11:33PM
पणजी :  प्रतिनिधी

आगामी लोकसभा  निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे.  देशाला केवळ भाजप व पंतप्रधान  नरेंद्र मोदीच मजबूत सरकार देऊ शकतात,  असे प्रतिपादन करून लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपचाच विजय  होऊन मोदी सरकारला हातभार लागणार आहे, असा विश्‍वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी बांबोळी येथील साग मैदानावर आयोजित अटल बुथ कार्यकर्ता संमेलनात  मार्गदर्शन करताना व्यक्‍त केला. 

देशातील गरीब जनतेचे राहणीमान वाढवण्याचे काम हे केवळ भाजप सरकारने केले आहे. मोदी सरकारने 129 योजना देशाच्या जनतेसाठी राबवल्या, असे सांगून शहा म्हणाले, 2019 च्या  लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणजे हे संमेलन. भाजपचा विजयरथ देशाच्या टोकापर्यंत नेणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप लोकसभा निवडणुका लढवणार आहे. मात्र, मोदी यांच्या विरोधात महागठबंधन स्थापन करण्यात आले आहे. महागठबंधनाचे सरकार जर लाभले तर ते देशाला काय गौरव मिळवून देणार, असा प्रश्‍न करून भारताला महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्याचे तसेच गौरव देण्याचे काम केवळ भाजपचे नेता तथा पंतप्रधान मोदी हेच करु शकतात, असेही शहा यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी व तत्कालीन संरक्षण मंत्री तथा  मुख्यमंत्री पर्रीकर यांनी देशाची सुरक्षा मजबूत केली, असे गौरवोद्वार शहा यांनी काढले. भाजपने लष्करासाठी आत्तापर्यंतची सर्वाधिक 3 लाख हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा बदला उरी येथे करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकव्दारे घेण्यात आला. यामुळे भारत इस्राईल तसेच अमेरिका यासारख्या देशांच्या यादीत आला आहे. घुसखोरीमुळे देशाच्या सुरक्षेला धोका पोचतो. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करा; काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत घुसखोरी संपवून टाकू,असे शहा यांनी सांगितले.

व्यासपीठावर  भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेेंडुलकर, केंद्रीय आयुष मंत्री  श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा खासदार  अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, सभापती  डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती मायकल लोबो, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री विश्‍वजित राणे, आमदार राजेश पाटणेकर, प्रवीण झांटये, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

या संमेलनाला भाजपचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री पर्रीकर  व्यासपीठावर  येताच कार्यकर्त्यांनी एकच जल्‍लोष केला. भाजप अध्यक्ष  शहा यांनी यावेळी व्यासपीठावर हजर असलेल्या  काही मंत्री तसेच आमदारांची नावे चुकीची उच्चारल्याने उपस्थितांमध्ये खसखस पिकली.

एकजूट रहा : मुख्यमंत्री पर्रीकर

एकजूट रहा. लहान लहान गोष्टी विसरून देशासाठी काम करा, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अटल बुथ कार्यकर्ता संमेलनात उपस्थित कार्यकर्त्यांना केले. पर्रीकर यांनी संमेलनात 15 मिनिटे उपस्थिती लावली व पाच मिनिटेच भाषण केले. आपण आता थोडक्यात भाषण करणार असून निवडणुकीसाठी भाषण राखून ठेवले असल्याचे सांगून ते म्हणाले, पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्याचे लक्ष्य सर्वांनी समोर ठेवून काम करावे.