Mon, Sep 21, 2020 06:05होमपेज › Goa › फातोर्ड्यात सुसज्जमासळी मार्केट उभारणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

फातोर्ड्यात सुसज्जमासळी मार्केट उभारणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Last Updated: Feb 14 2020 11:37PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

गोव्यात मासळीची आवक वाढत चालली असून मासळीच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मासळी हा मोठा उद्योग आहे. विविध राज्यांतील मासळी गोव्याच्या बाजारपेठेत येते. सरकारने मत्सोद्योगाची दखल घेतलेली आहे. मच्छीमार व मासळी  उद्योजकांना व्यावसायिक दृष्टीने सोयीस्कर ठरण्यासाठी फातोर्डा येथे सर्वसोयींनी सुसज्ज, असे जागतिक दर्जाचे घाऊक मासळी मार्केट उभारणार आहे. त्या घाऊक मासळी मार्केटची लवकरच कोनशीला बसविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

कांपाल येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर मत्स्योद्योग खात्यातर्फे अ‍ॅक्वा गोवा मेगा फिश 2020 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मत्स्योद्योग मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्ज, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, आमदार प्रसाद गावकार, फ्रान्सिस सिल्वेरा, मनपाचे महापौर उदय मडकईकर, मत्स्योद्योग  खात्याचे सचिव पी.एस. रेड्डी, संचालिका डॉ. शर्मिला मोंतेरो, तटरक्षक दलाचे महानिरीक्षक एस. हिमांशू, सिने अभिनेत्री मुग्धा गोडसे, सदानंद शेट तानावडे, सुभाष फळदेसाई व्यासपीठावर उपस्थित होते.

फातोर्डात सुरू करण्यात येणार्‍या जागतिक पातळीवरील घाऊक मासळी मार्केटात सरकारतर्फे कोल्ड स्टोरेज व मच्छीमारांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नंतरच्या काळात त्या घाऊक मासळी मार्केटात परराज्यातून येणार्‍या मासळीचे प्रमाण वाढणार असून खरेदी-विक्रीही वाढणार आहे. त्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी मासळीच्या व्यवसायात झोकून देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

राज्यात दरवर्षी एक डझनहून जास्त कार्यक्रम व महोत्सवाचे आयोजन होते. अर्थात महिन्याला एक महोत्सव आयोजित होतो. त्यामुळे गोवा हे महोत्सवाचे राज्य बनले आहे. मासळी गोव्याचे खास आकर्षण आहे. मत्स्योद्योग खात्याने आयोजित केलेल्या या अ‍ॅक्वा महोत्सवाला जगभरातील लोक भेट देणार आहेत. मत्स्योद्योग व मत्सोद्योगाच्या क्षेत्रात उतरलेल्या व्यावसायिकांनी व्यावसायिक दृष्टीकोनातून या महोत्सवाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मत्स्योद्योग खात्यातर्फे दरवर्षी मत्स्य-महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवातून स्थानिक मच्छीमारांना मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या विविध तंत्रज्ञानाची माहिती मिळते. तसेच मासेमारी करण्यासाठी लागणारी आधुनिक व दर्जात्मक तंत्रज्ञानाची सामुग्री मिळते. त्यासाठी स्थानिक मच्छीमारांसाठी हा महत्वपूर्ण महोत्सव आहे. सरकारकडून मच्छीमारांना चांगल्या सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. जास्त प्रमाणात स्थानिक मच्छीमारांनी  मत्सोद्योगाकडे वळावे असे, मच्छीमारमंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

मत्स्योद्योग खात्याच्या संचालिका डॉ. शर्मिला मोंतेरो यांनी स्वागत करून सांगितले की, निळ्या अर्थव्यवस्थेशी  निगडीत असलेल्या विविध क्षेत्रातील वैज्ञानिक, तज्ज्ञ व तंत्रज्ञांनी भाग घेतलेला आहे. या मत्स्य-महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्याकडून बरेच ज्ञान प्राप्त करता येते. मत्स्य  व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी या मत्स्य-महोत्सवाला भेट देऊन ज्ञानात भर घालावी असे, डॉ. मोंतेरो यांनी सांगितले. या मत्स्य-महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील मासळी व्यवसायाशी संबंध असलेले मच्छीमार व मत्स्योद्योजकांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यातआला. त्यात अजित चोडणकर, हर्षद धोंड, मिंगेल रॉड्रिग्ज, लिब्रेटा, आनामारीया कुलासो, आग्नेल रॉड्रिग्ज, जुवांव लोबो, कायतान फर्नांडीस व झुआरी फिशरमेन सोसायटी यांचा समावेश आहे. कांपाल येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर तीन दिवस हा मत्स्य-महोत्सव चालणार आहे. सकाळी 10 ते रात्री उशिरा 9 वाजेपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. 

 "