Mon, Sep 21, 2020 04:23होमपेज › Goa › शिरोडा वगळता अन्य निवडणूक न लढवण्याचे ‘मगो’चे धोरण

शिरोडा वगळता अन्य निवडणूक न लढवण्याचे ‘मगो’चे धोरण

Published On: Apr 02 2019 1:56AM | Last Updated: Apr 02 2019 1:15AM
पणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्रवादी गोमंतक  पक्षाने (मगोप) लोकसभेच्या निवडणुकीसाठी  आणि विधानसभेच्या शिरोडा वगळता म्हापसा, मांद्रे मतदारसंघात स्वत:चे उमेदवार न उतरवण्याचे धोरण अवलंबण्याचे निश्‍चित केले आहे. ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ या तत्त्वाला अनुसरून भाजपविरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या अन्य पक्षांच्या अथवा बलवान अपक्ष उमेदवाराला बाहेरून पाठिंबा देण्याचा मगोचा विचार असून यासंबंधी येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मगोच्या दोन आमदारांना फोडून भाजपात प्रवेश दिल्याबद्दल तसेच ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याबद्दल मगो पक्ष पदाधिकार्‍यांत तसेच कार्यकर्त्यांमध्ये भाजपविरोधात मोठी चीड निर्माण झाली आहे. दक्षिण आणि उत्तर गोव्यातील अनेक मतदारसंघांत मगो समर्थकांना एकत्र आणून भाजपला धडा शिकवण्याचा चंग मगो नेत्यांनी बांधला आहे. यासाठी शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत  लक्ष घालून पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांना पुन्हा  निवडून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

म्हापशात भाजपचे माजी आमदार स्व. फ्रान्सिस डिसोझा  यांच्या पुत्राला, जोशुआला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या सुधीर कांदोळकर यांच्यामागे मगोने आपली ताकद उभी करण्याचे ठरविले आहे. मगोचे 2017 सालच्या विधानसभेचे उमेदवार बाळू फडके यांनी कांदोळकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या दिवशीच मगोचे छुपे धोरण काहीसे खुले केले होते. मगोने मांद्रेत अपक्ष उमेदवार जीत आरोलकर यांच्यामागे शक्ती उभारण्याचे ठरवल्याचे सूत्रांनी सांगितले. 

23 मे नंतर गोव्यात स्थित्यंतर : दीपक ढवळीकर

प्रत्येक राजकीय पक्षाचे स्वत:चे असे धोरण असून मगोनेही यंदाच्या लोकसभा आणि विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकांसाठी एक धोरण आखले आहे. हे धोरण वेळ आल्यावरच उघड केले जाणार आहे. मात्र, 23 मे नंतर गोव्यात राजकीय स्थित्यंतर होणार असून फुटीरांना मोठा धक्‍का बसणार आहे. या धोरणाबद्दल सध्या ‘वेट अँड वॉच’  एवढेच सांगू शकतो, असे मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.