Mon, Sep 21, 2020 05:05होमपेज › Goa › महाराष्ट्र, कर्नाटकातून येणार्‍यांवर निर्बंधाचा विचार ः मुख्यमंत्री 

महाराष्ट्र, कर्नाटकातून येणार्‍यांवर निर्बंधाचा विचार ः मुख्यमंत्री 

Last Updated: Mar 21 2020 1:14AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या सीमा ‘सील’ करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून प्रवेश करणार्‍या पर्यटकांवर निर्बंध घालण्याचा सरकारचा विचार आहे.जीवनावश्यक वस्तूंसाठी गोवा शेजारील राज्यांवर अवलंबून असल्याने माल आयातीवर बंदी घालण्यात येणार नाही. मात्र, राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी येऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केले 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शुक्रवारी संध्याकाळी ‘व्हिडीओ कॉन्फरस’द्वारे चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, की राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी येऊ नये. पर्यटकांनी, राज्यात आल्यास अधिक प्रमाणात प्रवास आणि वाहतूकही करू नये. अत्यावश्यक असल्याशिवाय पर्यटकांनी आपापल्या राज्याच्या सीमा ओलांडण्याची गरज नसल्याचे आवाहन पंतप्रधानांनीच केले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून रस्ता आणि रेल्वे मार्गावरून नियमितरीत्या गोव्यात येणार्‍या नागरिकांनी ‘कोरोना व्हायरस’ संबंधी आपल्या आरोग्याची चाचणी करावी. गोव्यात संसर्ग पसरणार नाही, याची दक्षता पर्यटकांनी घ्यावी. अजूनही राज्यात कलम-144 लागू करण्यात आलेले नाही. मात्र, तसे करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. 

गोमंतकीयांनीही तपासणी करावी

पुणे, मुंबईहून राज्यात येणार्‍या गोमंतकीयांनी घरी जाण्याच्या आधी गोमेकॉ आणि अन्य इस्पितळात जाऊन स्वत:ची ‘कोरोना व्हायरस’संबंधी आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे. काळजी ही आधी स्वतःपासून घ्यावी लागेल. आवश्यक भासल्यास परराज्यात जाऊन परतलेल्या गोमंतकीयांनी स्वत:च्या हातावर ‘स्टॅम्प’मारून आपल्या घरातच राहून 14 दिवसांच्या कालावधीसाठी विलगीकरण करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
 

 "