Mon, Sep 21, 2020 05:32होमपेज › Goa › लोकसभा निवडणुकीतून ‘मगोप’ची माघार

लोकसभा निवडणुकीतून ‘मगोप’ची माघार

Published On: Apr 03 2019 1:44AM | Last Updated: Apr 03 2019 12:24AM
पणजी : प्रतिनिधी 

लोकसभेच्या निवडणुकीला केवळ वीसच  दिवस उरले आहेत. या कमी वेळेत सर्व  मतदारसंघातील कार्यकर्ते व जनतेपर्यंत पोचणे शक्य नाही. त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यावा, यासंदर्भातील निर्णय 8 एप्रिलनंतर घेतला जाईल, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

म्हणाले, मगो पक्ष लोकसभेची निवडणूक लढविणार नाही. मात्र, येत्या 8 एप्रिलनंतर कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला   पाठिंबा द्यावा, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मगोपच्या केंद्रीय समितीकडून हा  निर्णय घेतला जाईल. 

लोकसभा निवडणुकीची तयारी केवळ वीस दिवसांत होणे शक्य  नाही. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरणे योग्य ठरणार नसून दुसर्‍या उमेदवारांना पाडण्यासाठी मगो पक्ष निवडणुकीत उतरला असे लोकांना वाटू शकते. मगो पक्ष केवळ पक्षबदलू धोरणाच्या विरोधात आहे. हा मुद्दा घेऊनच शिरोडा पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. 

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर  यांनी मगो पक्षाचे दोन आमदार फुटल्यानंतर  तसेच सुदिन ढवळीकरांना मंत्रिमंडळातून हटवल्यानंतर  मगो पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार, असे सुतोवाच केले होते. मात्र, यासंदर्भात मगोकडून  काहीच स्पष्टपणे सांगण्यात आले नव्हते. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात सुदिन ढवळीकर यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगून भूमिका  स्पष्ट केली.