Thu, Oct 01, 2020 02:18होमपेज › Goa › मडगाव : अखेर पावाची दरवाढ मागे

मडगाव : अखेर पावाची दरवाढ मागे

Published On: Sep 28 2019 1:20AM | Last Updated: Sep 28 2019 12:05AM
मडगाव : प्रतिनिधी

समस्त गोमंतकीयांच्या नाश्त्यातील अविभाज्य घटक असलेल्या पावाची किंमत वाढवण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याने काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. विरोधी पक्षनेते तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या मध्यस्थीमुळे अखिल गोवा बेकर्स संघटनेने पाव आणि पोळीची नियोजित दरवाढ मागे घेतली असून आता पाव पूर्वीप्रमाणे चार रुपये किंमतीत विकला जाणार आहे.

पाव तयार करण्यासाठी लागणारा मैदा, लाकूड तसेच इतर वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने पावाचा दर एका रुपयाने वाढवून चार रुपयांवरून पाच रुपये करण्याचा निर्णय ऑल गोवा बेकर्स अँड कन्फेक्शनर्स असोसिएशनने घेतला होता. ही दरवाढ 10 ऑक्टोबरपासून लागू केली जाणार होती. बेकर्स संघटनेच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. अखेर आमदार दिगंबर कामत यांच्या हस्तक्षेपामुळे अखेर हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा संघटनेने पत्रक प्रसिद्ध करून या निर्णयाची माहिती दिली.

दिगंबर कामत यांनी संघटनेशी चर्चा करून त्यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यासाठी दिगंबर कामत यांनी पुढाकार घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार डॉ. नंदकुमार कामत यांच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचा विचार सर्वांना मान्य झाला आहे. सहकार भांडारमधून मैद्याचा घरपोच पुरवठा, मैद्याचा निकृष्ट दर्जा असल्यास त्याची ताबडतोब बदली करून देणे, तसेच एका बिलवर क्रेडिट देण्याची मागणी आमदार दिगंबर कामत यांच्या सहकार्याने सरकार दरबारी मांडली जाणार आहे. कामत यांनी बेकर्सना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे पीटर फर्नांडिस यांनी पत्रकात म्हटले आहे. 

पारंपरिक पाव ही गोव्याची खरी ओळख आहे. हा व्यवसाय गोमंतकीयांच्या हातात राहावा यासाठी बेकरीचा व्यवसाय बंद केलेल्या आणि परप्रांतीयांच्या हाती हा व्यवसाय दिलेल्या गोमंतकीय व्यावसायिकांना पुन्हा या व्यवसायाकडे आकर्षित करण्याची गरज आहे. सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी फर्नांडिस यांनी केली आहे.

व्यवसाय बंद केलेल्या बेकर्सना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबरोबर व्याजरहित कर्ज, अनुदान आणि बेकरीचा व्यवसाय सुरू करू पाहणार्‍या युवकांना औद्योगिक वसाहतीत प्राधान्याने प्लॉटस् उपलब्ध करून देण्याची मागणी फर्नांडिस यांनी केली आहे. परवाने आणि दाखले मिळविण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करावी, बेकरीतील पदार्थ विकण्यासाठी दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या खरेदीवर अनुदान द्यावे. सध्या जळाऊ लाकडाची कमतरता असल्याने मोफत ओव्हन उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी बेकर्स संघटनेने केली आहे.आमदार दिगंबर कामत यांनी या सर्व मागण्या सरकारकडे मांडण्यासाठी त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने नियोजित दरवाढ मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे.