Mon, Sep 21, 2020 04:45होमपेज › Goa › जाहीर प्रचाराची आज होणार सांगता

जाहीर प्रचाराची आज होणार सांगता

Published On: Apr 21 2019 1:39AM | Last Updated: Apr 21 2019 1:39AM
पणजी : प्रतिनिधी
राज्यातील लोकसभेच्या दोन तसेच तीन मतदारसंघांत होणार्‍या विधानसभा पोटनिवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता आज (दि. 21) संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. त्यामुळे मागील महिन्याभरापासून सुरू असलेली जाहीर प्रचाराची धामधूम संपुष्टात येणार आहे. 

दरम्यान निवडणुकीच्या तयारीसाठी  निवडणूक आयोग सज्ज झाला आहे.  निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर  राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस कर्मचार्‍यांची  ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये बैठक घेऊन पोलिस  अधिकार्‍यांनी त्यांना मार्गदर्शन केले. 

लोकसभा व पोटनिवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची सांगता होत असल्याने  आता उमेदवारांकडून घरोघरी जाऊन  मतदारांची भेट घेण्यावर भर दिला जाणार आहे. 

राज्यात उत्तर व दक्षिण गोवा  अशा लोकसभेच्या दोन तर मांद्रे, शिरोडा व म्हापसा या विधानसभेच्या तीन  मतदारसंघांमध्ये मंगळवार 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.

निवडणुकांच्या तारखांची घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली होती. त्यानंतर भाजप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी, मगो या राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांकडून देखील जाहीर प्रचारावर भर देण्यात आला होता. यात जाहीर सभांबरोबरच कोपरा सभा, रॅलींवर भर देण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीसाठी  भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर सभा घेतल्या. याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही प्रचार सभा झाल्या. भाजपकडून विविध भागांमध्ये  या स्टार प्रचारांकडून सभा घेण्यात आल्या. मात्र, काँग्रेसच्या प्रचारासाठी  नवज्योत  सिंग सिध्दू वगळता अन्य कुणीही गोव्यात आले नाही. परंतु असे असले तरी  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर गोवा उमेदवार गिरीश चोडणकर व काँग्रेसच्या आमदारांनी जाहीर प्रचारात कसलीच कमतरता सोडली नाही. 

लोकसभा निवडणुकीची धामधूम राज्यात सुरु असतानाच मांद्रे, शिरोडा व म्हापसा या तीन मतदारसंघांमध्ये होणार्‍या  पोटनिवडणुकांसाठीदेखील  जाहीर प्रचाराला बराच जोर आहे. यंदा प्रचारावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे महिनाभर चाललेला जाहीर प्रचार  शांततापूर्ण वातावरणात पार पडला.