Mon, Sep 21, 2020 05:43होमपेज › Goa › गोव्यात 31 पर्यंत लॉकडाऊन

गोव्यात 31 पर्यंत लॉकडाऊन

Last Updated: Mar 25 2020 12:26AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात ‘गोवा महामारी आजार नियम-2020’खाली मंगळवारच्या मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत शंभर टक्के लॉकडाऊन लागू केले जात आहे. राज्यात कुठलेही दुकान वा बाजार खुले ठेवता येणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास मुभा दिली जाणार आहे. राज्यातील जनतेला यामुळे त्रास होणार असला तरी सर्वांच्या आरोग्याच्या भल्यासाठी आणि हितासाठी लॉकडाऊन करणे भाग पडले आहे. यासाठी सर्व गोमंतकीयांनी कृपा करुन या काळात घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पर्वरी येथील सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. 

पर्वरी येथील मंत्रालयात सोमवारी सकाळी मंत्रिमंडळाची आणि सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री सावंत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात ‘जनता कर्फ्यू’ लागू झाल्यापासून मागील काही दिवसांचा आढावा घेता गोव्यात मंगळवारपर्यंत ‘कोरोनाव्हायरस’ बाधीत एकही रुग्ण सापडलेला नाही. ही चांगली गोष्ट असली तरी गोव्यात ‘कोरोनाव्हायरस’ अस्तित्वात आहे, हे सत्य आहे. यामुळे, हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारला काही कठोर पावले उचलावी लागत आहेत. आपण सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली असून त्यांच्याकडून सूचना व शिफारसीही घेतल्या आहेत. त्यानुसार कर्फ्यू लागू राहणार आहे. राज्यात सामाजिक संसर्गाची अजून लागण झाली नाही, तरी आरोग्यासाठी हे त्रास सहन करावे लागणार आहेत. यापुढे कोणी घराबाहेर पडलेला आढळल्यास पोलिसांना ‘गोवा महामारी आजार नियम-2020’ खाली कडक पावले उचलावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला. 

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील लोकांनी मागील दोन दिवस भुसारी सामान घेतले असले तरी बाजारात व दुकानांत ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर पाळले जात नसल्याचे आढळून आले आहे. चीन, इटलीसारख्या देशांतील परिस्थिती आपण पाहिली असून तशी स्थिती गोव्यावर ओढवू नये, यासाठी खबरदारी घेण्याची आपली सर्वांना कळकळीची विनंती असल्याचे ते म्हणाले. 

दरदिवशी देशात 30 ते 40 अशी रुग्णांची संख्या वाढत असून लोकांना या आजाराचे गांभीर्य समजलेले नाही. त्यामुळे, यापुढे एकही दुकान खुले ठेवू दिले जाणार नाही. राज्यात दूध, तांदूळ, डाळ, भाजीपाला, अंडी आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची सोय सरकारद्वारे केली जाणार आहे. जिल्हाधिकारी, मामलेदार यांच्यातर्फे पुढील दोन दिवसांत सदर पुरवठा करण्याबाबत यंत्रणा तैनात केली जाणार आहे. राज्यात गोवा डेअरीचीच दूध संकलन प्रक्रिया सुरू राहणार असून गोवा डेअरीची राज्यभरातील केंद्रे खुली ठेवली जाणार आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील बेकार व आसरा नसलेल्यांसाठी खास ‘आसरा गृह’ वा शिबिरेही सरकारद्वारे उघडली जाणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

शेजारील राज्यांतून प्रवास करून कामासाठी नियमितपणे गोव्यात येणार्‍यांनी वा घरी परतलेल्यांनीही स्वत:ची चाचणी करून घरातच विलगीकरण करावे, असे आपण आवाहन केले होते. यासंबंधी सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे असलेल्यांची आणि परराज्यांतून आलेल्या गोमंतकीयांचीही सुमारे हजार लोकांनी माहिती ‘9607909559’ वा 104 या क्रमांकावर दिली आहे. यातील सुमारे 50 टक्के संदेश खरे असल्याचे सिद्ध झाले. ज्या लोकांच्या हातावर घरातच विलगीकरण राखण्याचा शिक्का मारलेला असून, ते विलगीकरण पाळत नसतील, तर अशा लोकांना पोलिस बळजबरीने इस्पितळात ठेवणार आहेत. राज्यातील सरकारी इस्पितळासाठी 60 ‘व्हेंटिलेटर’ खरेदी करण्यात येणार आहेत. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नियमीत ‘ओपीडी’ बंद करण्यात आली आहे. मात्र, सरकारी इस्पितळात ‘कॅज्युअल्टी’ सुरू राहणार असून लहान-सहान आजारासाठी इस्पितळात जाणे टाळावे, असे आवाहन सावंत यांनी केले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून या समितीला विविध निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. याशिवाय, मुख्यमंत्र्यांचे कार्यालय 24 तास खुले राहणार असून राज्यभरातील घटनांवर लक्ष ठेवले जाणार आहे. राज्यात तीन गंभीर कोरोनाव्हायरसचे रुग्ण सापडले असले तरी ते आता बरे झाले असून धोक्याबाहेर आहेत. राज्यात अनेकजण गैरसमज आणि अफवा पसरवत असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. 
 

 "