Thu, Oct 01, 2020 17:09होमपेज › Goa › विधानसभा पोटनिवडणूक : शिरोड्यात भंडारी, ख्रिस्ती घटक निर्णायक

विधानसभा पोटनिवडणूक : शिरोड्यात भंडारी, ख्रिस्ती घटक निर्णायक

Published On: Apr 21 2019 1:39AM | Last Updated: Apr 21 2019 12:10AM
फोंडा : प्रतिनिधी

विधानसभेच्या शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवर राज्यभराचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस की मगो पक्षाचा उमेदवार निवडून येतो, याबाबत शिरोडा मतदारसंघातील कोपर्‍याकोपर्‍यावर चर्चा रंगत आहे. मात्र चर्चा जोरदार होत असली तरी अजून मतदार कुणाच्या बाजूने हे कळणे मुश्किलीचे ठरले आहे. तरीपण या मतदारसंघातील भंडारी आणि कॅथलिक फॅक्टर मात्र ‘डिसिजन मेकर’ ठरणार असल्याचे बोलले जाते. 

शिरोडा मतदारसंघात भाजपतर्फे सुभाष शिरोडकर, काँग्रेसतर्फे महादेव नाईक आणि मगोतर्फे दीपक ढवळीकर निवडणूक रिंगणात आहे. गोवा सुरक्षा मंच आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उतरले असले तरी  त्यांची मोठी चर्चा नाही. 

शिरोडा मतदारसंघातील अर्धेअधिक मतदार हे भंडारी समाजाचे आहेत. शिरोडा पंचायतक्षेत्रात सर्वाधिक मतदार हे भंडारी समाजाचे आहेत. त्यानंतर बोरी व इतर भागातील आहेत. यावेळेला शिरोडा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांतर्फे दोन भंडारी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. महादेव नाईक व सुभाष शिरोडकर हे भंडारी समाजाचे प्रतिनिधी आहेत. तर बहुजन समाजाचा पक्ष म्हणून गणला जाणार्‍या मगो पक्षातर्फे ब्राम्हण समाजाचा उमेदवार निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहे. भंडारी समाजाची मते विभागून न जाता एकगठ्ठा ज्या उमेदवाराला मिळतील, त्याचा विजय निश्‍चित असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर शिरोडा व पंचवाडी भागातील ख्रिश्‍चन समाजातील मतदारही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे ख्रिश्‍चन समाजाची एकगठ्ठा मतेही निर्णायक होऊ शकतात. इतर समाजाचे प्राबल्य या मतदारसंघात आहेच, पण भंडारी आणि ख्रिश्‍चन मतदार ज्यांच्या बाजूने उभे राहतील, त्यांनाच शिरोड्याचे प्रतिनिधित्व मिळू शकेल, अशी चर्चा आहे. सद्यस्थितीत मगो, भाजप आणि काँग्रेस तिन्ही पक्ष कॅथलिक लॉबी आपल्या मागे असल्याचे सांगतात. 

सद्य:स्थितीत शिरोडा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि मगोच्या बैठका होत आहेत. खास करून मगो आणि भाजपने सभांच्याबाबतीत आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार महादेव नाईक यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत बरीच कामे केली आहेत. ही कामे महादेव नाईक यांना तारून नेऊ शकतात, की सत्ताधारी भाजपचा वरदहस्त सुभाष शिरोडकरांना लाभू शकतो की दोन्ही फुटीर आमदार नकोच म्हणून मगोला मतदान झाले तर काय द्यस्थितीत शिरोड्याचे प्रतिनिधीत्व भाजप, मगो की काँग्रेसला याबाबत कुणीच  अंदाज बांधू शकत नाही, अशी स्थिती आहे.