Mon, Sep 21, 2020 06:14होमपेज › Goa › फोंडा पालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात

फोंडा पालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात

Published On: Apr 26 2018 2:14AM | Last Updated: Apr 26 2018 2:07AMफोंडा : प्रतिनिधी

फोंडा पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून गुरुवार व शुक्रवारी सर्व उमेदवार अंतिम फेरी पूर्ण करण्याची तयारी करीत आहे. भाजप, मगो, काँग्रेस व स्वाभिमान फोंडेकर पॅनलसह अन्य स्वतंत्र उमेदवारात चुरशीची लढत होणार आहे. 

भाजप पॅनलची धुरा सांभाळणारे सुनील देसाई व अन्य नेते प्रचारात व्यग्र आहेत. भाजप व मगोने  5 वर्षांपूर्वी युती करून पालिका निवडणूक लढविली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री पालिका निवडणुकीच्या प्रचारात आले होते. मात्र, यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने अजून भाजपची मदार सुनील देसाई सांभाळत आहे. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून सुनील देसाई यांनी निवडणूक लढविली होती. भाजपच्या नागरिक समितीतर्फे माजी नगरसेवक आरवीन सुवारीस, व्यंकटेश नाईक, विश्‍वनाथ दळवी व शांताराम कोलवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एकूण 15 पैकी 14 प्रभागात फोंडा नागरिक  समितीचे उमेदवार रिंगणात  आहेत. 

मगोच्या रायझिंग फोंडातर्फे  15 प्रभागात उमेदवार निवडणूक लढवित असून केतन भाटीकर पॅनलची सर्व सूत्रे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाळत आहेत. फोंडा मतदारसंघाचे मगोचेे अध्यक्ष अनिल उर्फ सूरज नाईक स्वतः प्रभाग 11 मधून निवडणूक लढवित आहेत. त्या प्रभागात आमदार रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक निवडणूक लढवीत असल्याने सर्वांच्या नजरा या प्रभागावर आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रितेश नाईक हे स्थानिकांच्या मागणीनुसार निवडणुकीत उतरले आहे. मगोच्या रायझिंग फोंडा पॅनलमध्ये माजी नगरसेवकांचाही  समावेश आहे.   

फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली  फोंडा नागरिक प्रागतिक मंचचे पॅनल सध्या प्रचारात व्यग्र आहेत. उमेदवारांसोबत कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत. आमदार रवी नाईक यांनी सर्वच प्रभागात कोपरा बैठक घेण्यास प्राधान्य दिले आहे. प्रभाग 11 मधून 4 उमेदवार रिंगणात उतरल्याने लढत चुरशीची बनली आहे. स्वाभिमानी फोंडेकर, मगो, भाजप व काँग्रेस या प्रभागात अधिक लक्ष देत मतदार कोणत्या उमेदवाराला पसंती देतात हे निवडणुकीनंतर कळून येणार आहे. 

स्वाभिमानी फोंडेकर यांच्यातर्फे फक्त 4 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. भ्रष्टाचार मुक्त पालिका करण्याचा प्रयत्न स्वाभिमानी फोंडेकर निवडणुकीत उतरले असले तरी भाजप, मगो व काँग्रेस यांच्या पॅनल विरुद्ध विजय प्राप्त करणे मोठे आव्हान ठरणार आहे. 

फोंडा पालिका क्षेत्रात मार्केटचा सोपो प्रश्‍न, पाणी समस्या, खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी, मलनिस्सारण प्रकल्पाला होणारा विरोध व अन्य समस्या फोंडावासीयांना सतावत आहेत. त्यात गेल्या 5 वर्षांतील मगो व भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा फायदा उठविण्याच्या प्रयत्नात आमदार रवी नाईक दिसत आहेत. मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी भाजप व मगो मध्ये हातमिळवणी होण्याची शक्यता मतदार व्यक्त करीत  आहेत. 

फोंडा पालिका क्षेत्रात राहणारे लोक मुलांसमवेत सुट्टी घालविण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे पालिका  निवडणुकीत 10 ते 20 टक्के  कमी मतदान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.