Sun, Sep 20, 2020 09:15



होमपेज › Goa › उमेदवाराला मालमत्तेचे बाजारभावानूसार मूल्य देणे बंधनकारक: एडीआर

उमेदवाराला मालमत्तेचे बाजारभावानूसार मूल्य देणे बंधनकारक: एडीआर

Published On: Mar 14 2019 3:16PM | Last Updated: Mar 14 2019 3:16PM




पणजी : प्रतिनिधी

आगामी लोकसभा आणि पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार्‍या उमेदवाराला आपण स्वत:सह, पत्नी आणि  कटुंबातील अवलंबून असणार्‍या सदस्यांची गेल्या पाच वर्षाचा लेखाजोगा प्रमाणपत्राद्वारे द्यावा लागणार  आहे. यात आर्थिक व्यवहारासह  मालकीच्या मालमत्तेचे सध्याच्या बाजारभावानूसार मूल्य देणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) संघटनेचे निमंत्रक भास्कर असोल्डेकर यांनी दिली.

येथील ‘जीसीसीआय’ सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत असोल्डेकर आणि सह-निमंत्रक मांगरिश रायकर हजर होते. त्यावेळी असोल्डेकर हे म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाकडूंन अनेक नव्या अटी आणि नियमांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी ज्या वर्षी निवडणूक लढवली जाते, त्याच्या आदल्या वर्षाचे आयकर भरणा आदीचीच फक्त माहिती दिली जात असे. आता निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या उमेदवाराला आपणासह पत्नी वा पतीची तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांच्या संपत्तीचीही माहिती उघड करावी लागेल. यासाठी सर्व सदस्यांच्या मागील पाच वर्षाचा लेखाजोगा द्यावा लागणार आहे. जर उमेदवार विभक्त हिंदू कुटुंबातील सदस्य असेल आणि कर्ता असेल तरीही हाच नियम त्याला लागू होणार आहे. स्थावर मालमत्ता असेल तर खरेदी केलेली किंमत न देता सध्याच्या बाजारभावानुसारची किंमत उघड करावी लागेल. मागील पाच वर्षाचा हिशोब दिला गेल्याने उमेदवाराची आर्थिक प्रगतीचा लेखाजोगाच मतदारांना समजणार आहे. यामूळे कुठल्या उमेदवाराला मत द्यावे,की न द्यावे याचा निर्णय करणे मतदारांना सोपे जाईल. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनूसार, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती सदर उमेदवाराने आपल्या राजकीय पक्षाला तसेच मतदारांना देणे आवश्यक आहे. यासाठी गुन्हेगारी खटले, एफआयआर, शिक्षा आदीची सर्व माहिती प्रमाणपत्राद्वारे उमेदवारी अर्जासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या राजकीय पक्षातर्फे उमेदवारी दिली जाते, त्या पक्षाच्या संकेतस्थळावरही सदर माहिती उघड करणे गरजेचे असल्याचे असोल्डेकर यांनी सांगितले.